खरात प्रकरणी पिडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणारे तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खरात प्रकरणी पिडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणारे तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
टाकळीभान प्रतिनिधी : सध्या नाशिकचे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात नवनवे धक्कादायक प्रकार चौकशीअंती पुढे येत आहेत. अशोक खरात प्रकरणी एसआयटीमार्फत जोरदार कसून चौकशी सुरु असून, खरातचे कारनामे चव्हाट्यावर येत आहेत. खरातशी संबंधित असलेल्या बड्या बड्या नेत्यांचे, पुढाऱ्यांचे त्याचप्रमाणे काही अधिकाऱ्यांचेही धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता या प्रकरणी पिडित महिलांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याचे प्रकरण तिघांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे तर एक जण पसार आहे.
राहुल गंगाधर शिंदे (रा. शिवाजी रोड, ता. कोपरगाव) व योगेश पंढरीनाथ आढाव (रा. मोहिनीनगर,कोपरगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघा अरोपींचे नाव असून, तिसरा आरोपी संदीप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) हा पसार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. खरात प्रकरणी एका पिडित महिलेचे अश्लिल व्हिडिओ बीएमडब्ल्यू या व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल झाले असून, या प्रकरणी पोलिस चौकशी अंती कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. भादंवि कलम २०२३ चे कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००४ कलम ६७ (अ) प्रमाणे २५ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे,
चौकट:-
तर कठोर कारवाई : घार्गे
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरु आहे. या प्रकरणी पिडित महिलांचे फोटो सोशल मिडियावर कोणीही व्हायरल करु नये. महिलेवी, नातेवाईकांची व कुटूंबियांची ओळख पटेल असे व्हिडिओ व्हॉटस अॅप ग्रुपवर आल्यावर ते तत्काळ डिलिट करावेत. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करु नये. तसे केल्यास सोशल मिडियाच्या ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.



