बनावट सहीने सरपंचांचा राजीनामा सभापतींना पाठवला, त्यांनी मंजूरही केला
मी तर राजीनामा दिलाच नाही…; बनावट सहीने सरपंचांचा राजीनामा सभापतींना पाठवला, त्यांनी मंजूरही केला!, देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरूतील धक्कादायक प्रकार
देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू येथील सरपंच विजय गुरव यांचा राजीनामा पंचायत समिती सभापतींनी काल, १४ फेब्रुवारीला मंजूर केला. त्यानंतर पडताळणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यानंतर वेगळेच नाट्य समोर आले आहे. “मी स्वतः राजीनामा दिलाच नाही. कुणीतरी खोडसाळपणा करून बनावट स्वाक्षरीने राजीनामा सभापतींकडे पाठवला’, असा खुलासा सरपंच विजय गुरव यांनी आज, १५ फेब्रुवारीला लेखी पत्राद्वारे केला आहे. त्यामुळे सरपंचाचा राजीनामा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राजीनामा अर्जाची पडताळणी करण्यासंदर्भात गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सरपंच विजय गुरव यांनी त्यांची भूमिका मांडली.
गेल्या वर्षी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच विजय गुरव यांनी पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून आतापर्यंत ते सरपंच पदाचा कारभार सांभाळत आहेत. दरम्यान, ११ फेब्रुवारी २०२२ रोजी कुणीतरी त्यांची बनावट सही करून सरपंच पदाचा राजीनामा देऊळगाव राजा पंचायत समितीच्या सभापतींना पाठवला. सभापतींनी १४ फेब्रुवारीला तो मंजूरही करून टाकला आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पाठवला.
मात्र राजीनामा मी दिलेला नसून, तो ग्राह्य धरण्यात येऊ नये असेही गुरव यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे निमगाव गुरूचे राजकारण पेटले आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की विजय गुरव यांचा राजीनामा सभापतींनी मंजूर करून पडताळणीसाठी पाठवला आहे. याबाबत विशेष सभा बोलावून विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांमार्फत सदर प्रकरणाची सत्यता पडताळून सरपंचाचे प्रत्यक्ष मत नोंदवून पडताळणी पडताळणी केली जाईल व नंतर तसा अहवाल अहवाल प्राप्त झाल्यानंतर राजीनामा मंजुरी संदर्भात प्रक्रिया पूर्ण होईल, असे ते म्हणाले.