शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून नऊ ठार
टाकळीभान येते उसाच्या शेतात चरत असलेल्या चाळीस शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून नऊ ठार केल्या आहेत तर पाच जखमी झाल्या आहेत ही घटना (ता.४) शुक्रवार दुपारी बारा वाजता घडली. बिबट्याच्या दहशतीने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
गट नंबर ३१६ मध्ये काकासाहेब विनायक डिके यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काकासाहेब यांचे बंधू भास्कर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या चाळीस शेळ्यांचा कळप घेऊन शेजारीच असलेल्या गट नंबर ३२३ मध्ये खोडवा उसाच्या क्षेत्रात चरण्यासाठी सोडल्या. उसाचे पीक छातीभर वाढलेले असल्यामुळे ते बांधावर झाडाखाली बसून शेळयांवर लक्ष देऊन होते. अचानक शेळ्यांचा गोंगाटाचा आवाज येऊन सैरभैर होऊन घराच्या दिशेने धाऊ लागल्या. तेव्हा बिबट्याने हल्ला केला असावा ही बाब भास्कर यांच्या लक्षात आली. व त्यांनी आरडाओरड करून कुटुंबिय व परिसरातील शेतकऱ्यांना मदतीला बोलविले. धाडसाने शोधमोहीम सुरू केली तेव्हा सहा शेळ्या त्यांना मृतावस्थेत सापडल्या व तीन सायंकाळपर्यंत आढळून आलेल्या नव्हत्या. बाकी राहिलेल्या शेळ्यांमध्ये पाच शेळ्या जखमी होत्या. परिसरात झालेला बिबट्याचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.