शहरात अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांचा कळप मोकाटपणे फिरताना
शहरात अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांचा कळप मोकाटपणे फिरताना
श्रीगोंदा शहरात अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांचा कळप मोकाटपणे फिरताना दिसून येत आहे. या जनावरांचा त्रास शहरातील नागरिकांना आणि बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
या जनावरांचा दैनंदिन वावर हा नवीन झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर पहावयास मिळत आहे. त्यामध्ये आढळगाव रोड, भैरवनाथ मंदीर परिसर, तहसील कार्यालय परिसर, सोमवारी आठवडे बाजारात आणि शहरातील गल्लीमध्ये मोकाटपणे फिरताना दिसून येत आहे.
अनेक वेळा शहरातील मुख्य रस्त्यावर ही जनावरे बसलेली असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन काही अपघात देखील झालेले आहेत. आठवडे बाजारात ही जनावरे शेतकऱ्यांच्या शेतमालावर ताव मारत आहेत. अनेक वेळा शेतकरी त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न करतात परंतु ही जनावरे काही ऐकत नाहीत. बाजारात महिला लहान मुले, वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांच्यावर देखील या जनावरांकडून हल्ले झालेले नागरिकांनी सांगितले आहे.
तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या आवारातच ही जनावरं घाण करत आहे. खुद्द तहसीलदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती खेतमाळीस यांनी ही बाब तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या निदर्शनास आणून दिली होती तरी त्यावर तहसीलदार अथवा नगरपरिषदेकडून काहीच कारवाई झालेली नाही. आता मोकाट जनावरांचा मालक नक्की कोण ? या जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.
मागील आठवड्यात तहसीलदार यांनी खुद्द तहसील कार्यालयासमोर जनावरांनी इष्टा केलेली सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती खेतमाळीस यांनी तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर यावर तहसीलदार म्हणाले मी या जनावरांचा बंदोबस्त करतो पण आठवडा झाला तरी मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला नाही अशी खंतही सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती खेतमाळीस यांनी व्यक्त केली.