आरडगाव ग्रामपंचायत हद्दीत गेल्या पाचवर्षात रस्त्यांची कामे झाली नाहीत. अतिक्रमण वाढले, कोणताही विकास झाला नाही,

राहुरी तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायत हद्दीत गेल्या पाचवर्षात
रस्त्यांची कामे झाली नाहीत. अतिक्रमण वाढले, कोणताही विकास झाला नाही,
मात्र, मिळालेल्या निधीचा गैरवापर सुरू असून रस्त्यांसाठी आलेला निधी
गेला कोठे? सत्ताधार्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने गावातील
विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे गावाला कोणीच वाली नसल्याचा आरोप
विरोधी गटातील तीन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केला आहे.
आरडगाव येथील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी हे तीन ग्रामपंचायत सदस्यांनी
ग्रामस्थांना बरोबर घेऊन रस्त्यांची अवस्था बघितली. आरडगावात येणार्या
रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या पाचवर्षात दीड कोटी
रुपयांचा निधी आला. मात्र, रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी घमेलेभरही मुरूम
टाकण्यात आला नसल्याचा आरोप करीत हा निधी गेला कोठे? असा सवाल विरोधी
सदस्यांनी केला आहे. आरडगावात रस्त्यांच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या
आहेत. काही रस्ते तर दुरूस्तीअभावी बंद पडलेले आहेत. त्यामुळे काहीअंशी
दळणवळण ठप्प झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आरडगाव ते टाकळीमिया, आरडगाव मानोरी शिवरस्ता ते बोबडे वस्ती, तांदुळवाडी
शिव ते मारूती मंदिर, आरडगाव ते वनेवस्ती, वनेवस्ती ते टाकळीमिया
रेल्वेगेट कालवा रोड, आरडगाव वेस ते म्हसे वस्ती रोड, जुना मालुंजे रोड,
शेळके-बोबडे वस्ती ते मानोरी शिवरोड, काळेमळा रोड, लवण वस्ती रोड,
वनेवस्ती ते इंगळे वस्ती, जैतोबा मंदिर ते धसाळ-तनपुरे वस्ती रोड, महादेव
मंदिर ते तांदुळवाडी शिवरोड, आदी रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे.
ग्रामपंचायत कारभार्यांचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच या
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून त्यामुळे वाहनचालक हैराण
झाले आहेत. याकडे सत्ताधार्यांनी पाठ फिरविली असल्याचा आरोप विरोधकांनी
केला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद झुगे, सागर देशमुख, नितीन काळे, सुनील
जाधव, रवी गायकवाड, बाबासाहेब धसाळ, अनिल भारती, निलेश जगधने, प्रवीण
झुगे आदी उपस्थित होते.
चौकटः आरडगाव हद्दीत रस्त्यांची पाहणी केली. गेल्या पाच वर्षात एकाही
रस्त्याचे काम झालेले नाही. दीड कोटी रुपयांचा ग्रामनिधी आला. मात्र, तो
कोठे वापरला? याबाबत साशंकता आहे. कोणत्याच रस्त्याची दुरूस्ती नाही.
टाकळीमिया रस्ता तर बंदच पडलेला आहे. वाढलेले अतिक्रमण जेसीबीच्या
सहाय्याने काढावे लागणार आहे. मात्र, विकासकामात उदासिन असलेल्या
सत्ताधार्यांनी ग्रामविकासाला खीळ घातली आहे. गेल्या पाच वर्षात
ग्रामस्थांना विकासाचे तोंड पहायला मिळाले नाही.
बापूसाहेब धसाळ, माजी उपसरपंच, आरडगाव.
चौकटः आरडगाव रस्त्यांच्या समस्या सोशल मिडियावर पहायला मिळाल्या.
त्यानुसार रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांसाठी आमदार तनपुरे यांच्या
निधीतून 50 हजार रुपये व ग्रामपंचायतीचे 80 हजार रुपये असा 1 लाख 30
हजाराचा निधी रस्त्यांसाठी वापरल्याची माहिती सरपंचांनी दिली. मात्र,
प्रत्यक्षात कोणत्याच रस्त्यांवर मुरूम दिसला नाही. काही रस्त्यांवर
थातूरमातूर मुरूम टाकण्यात आला आहे. सत्ताधार्यांचा सध्या मनमानी कारभार
सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी चालढकल होत आहे. रस्ते
तातडीने दुरूस्त करा, अन्यथा आंदोलन करावे लागणार आहे.
अनिल जाधव, महासचिव, वंचित बहुजन आघाडी.