राहुरीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेचा शेतकर्यांनी फायदा घ्यावा – डॉ. पी.जी. पाटील
राहुरीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेचा शेतकर्यांनी फायदा घ्यावा
– डॉ. पी.जी. पाटील
दि. 7 जानेवारी, 2022
राहुरीच्या बियाणे विभागाअंतर्गत बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेचा शेतकर्यांनी त्यांच्याकडील बियाणे चाचणी करून घेण्यासाठी फायदा घ्यावा. राहुरीच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजने कडील बीज परीक्षण प्रयोगशाळा ही महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेली आहे. या प्रयोगशाळेमध्ये बियाणे कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांचे बियाणे प्रयोगशाळेत बियाणे उगवण क्षमतेसाठी तपासले जाते. याबरोबरच शेतकर्यांनी सुद्धा त्यांच्याकडील बियाणे पेरणीपूर्वी या प्रयोगशाळेत तपासून घ्यावे असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या भेटीदरम्यान कुलगुरू डॉ. पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलीक यांनी तंत्रज्ञान संशोधन योजना प्रक्षेत्र आणि प्रयोगशाळेतील विविध प्रयोगांना भेटी दिल्या. याप्रसंगी डॉ. गडाख म्हणाले या विभागात विविध विषयांवर होणारे संशोधन हे बियाणे उद्योगातील विविध भागधारकांसाठी खूपच लाभदायक आहे. या योजनेने मागील पाच वर्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावर 30 शिफारशी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रसाळ यांनी बियाणे प्रक्रियेतील विविध प्रयोगांचे निष्कर्ष हे येणार्या काळात उपयुक्त ठरतील असे सांगितले. बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. विजय शेलार यांनी प्रकल्पाच्या कामाविषयी आणि उपलब्धी विषयी माहिती दिली. बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस 2015-16 आणि 2018-19 असे दोन वेळेस राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट केंद्र म्हणून पुरस्कार मिळाला आहे. डॉ. सुरेश झांजरे, डॉ. बापूसाहेब पाटील, प्रा. रश्मी भोगे यांनी वेगवेगळ्या विषयांच्या प्रयोगांची माहिती दिली. या विभागातील इतर शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत साळुंके, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. कैलास गागरे, डॉ. धनश्री सरनोबत, डॉ. नारायण मुसमाडे, श्री. युवराज पवार हे भेटीदरम्यान उपस्थित होते.
राहुरी तालुका≠