टाकळीभान मध्ये कांदा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
टाकळीभान मध्ये कांदा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
टाकळीभान ता.१६: येथील उपबाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा एक रुपया प्रति किलो असा दर मिळाल्याने खिर्डी (ता.श्रीरामपूर) येथील शेतकरी भारत गंगाराम जाधव (वय ३५) या हतबल झालेल्या तरुण शेतकऱ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना (ता.१५) रविवार रोजी घडली.
जाधव यांनी टाकळीभान उपबाजार समितीत ४० गोण्या कांदे विक्रीसाठी आणले होते मात्र कांदा लिलाव सुरू होताच व्यापाऱ्यांनी कांदा गोणी फोडल्यावर त्यांच्या कांद्याला एक रुपया प्रति किलो असा कवडीमोल दर काढला व बोली पुढे न गेल्याने ते हतबल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. आज चौकशी केली असता त्यांची प्रकृती सुधारत आहे.
ʻʻएकीकडे उसाला तोड येत नाही ती आलीच तर एकरी १० ते १५ हजार रुपये ऊस तोडणी मजुरांना किंवा मशीनवाले यांना अगोदर द्यावे लागतात तर दुसरीकडे कांदा नो बीट होतो किंवा एक रुपया प्रति किलो दराने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि याच विवंचनेतून माझ्या भावाने विषारी औषध प्राशन केले असावे – भाऊसाहेब जाधव शेतकरीʼʼ
ʻʻ४० गोणी मार्केटपर्यंत आणण्यासाठी मला ३३०० रुपये खर्च आला व मला १२०० रुपये कांदा पट्टी मिळत होती भावाबाबत मी आडत व्यापाऱ्याला विचारले असता मला त्याच्याकडून शिवराळ भाषेत वागणूक मिळाली मला या गोष्टीचा खूप त्रास झाल्यामुळे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तो त्रास होऊ नये म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे . – पीडित शेतकरी भारत जाधवʼʼ