मुलाच्या स्मरणार्थ राजेंद्र कुंकूलोळ यांनी उभारले स्वखर्चातून बस थांबण्यासाठी निवारा शेड
मुलाच्या स्मरणार्थ राजेंद्र कुंकूलोळ यांनी उभारले स्वखर्चातून बस थांबण्यासाठी निवारा शेड
स्वर्गीय लोकेश राजेंद्र कुंकूलोळ यांच्या स्मरणार्थ कुंकूलोळ कुटुंबीयांनी बेलापूर खुर्द येथील एसटी बस थांबण्यासाठी स्वखर्चातून निवारा शेड बांधून दिले आहे. स्वर्गीय लोकेश यांचे वडील प्रगतशील शेतकरी राजेंद्र भगवानदास कुंकूलोळ यांनी सांगितले की बेलापूर खुर्दचे प्रभारी सरपंच दीपक बारहाते यांच्याकडे याबाबत इच्छा व्यक्त केली असता त्यांनी लगेचच ग्रामपंचायत प्रशासनामार्फत निवारा शेड साठी जागा उपलब्ध करून दिली.
बेलापूर खुर्द येथील चौकामध्ये गेली अनेक वर्षापासून राज्य परिवहन मंडळाचा अधिकृत बस थांबा आहे. परंतु तेथे आजपर्यंत निवारा शेड उभारले गेले नाही. स्थानिक नागरिकांनी एसटी प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही सदर बस थांब्याला निवारा शेड मिळले नाही. या रहदारीच्या चौकामध्ये, अरुंद रस्त्याच्या कडेला परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रवास सुरू करण्याआधीच धोकादायक परिस्थितीमध्ये बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत होते. श्री कुंकलोळ यांनी मुलाच्या स्मरणार्थ देऊ केलेल्या निवारा शेडमुळे बेलापूर खुर्द परिसरातील नागरिकांची तसेच पंचक्रोशीतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवारा शेड अभावी असणारी गैरसोय दूर झाली आहे.
श्री कुंकूलोळ यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आर्थिक मदत केलेली आहे. यापुढील काळात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये याच पार्श्वभूमीवर पाणपोई उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याबद्दल प्रभारी सरपंच दीपक बारहाते, माजी सरपंच अनिल गाढे, पोलीस पाटील युवराज जोशी, राकेश बडधे, सेवा संस्थेचे चेअरमन बी एम पुजारी, विलास भालेराव, द्वारकानाथ बडधे, संतोष बडधे, महेश बडधे यांचे सह ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले.