चार पोलिस कर्मचाऱ्यांकडे २५ गावांची सुरक्षा* चौसाळा परिसरात गुन्हेगारी वाढली : अनेक गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित
*चार पोलिस कर्मचाऱ्यांकडे २५ गावांची सुरक्षा*
चौसाळा परिसरात गुन्हेगारी वाढली : अनेक गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित
*बीड जिल्हाधीकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार–विवेक कुचेकर*
नेकनूर पोलिस ठाण्याअंतर्गत चौसाळा
(ता. बीड) येथे पोलिस चौकी आहे. या अंतर्गत चौसाळा व पालसिंगण हे दोन बिट आहेत. या दोन बीटमध्ये एकूण पंचवीस गावे आहेत. या गावांची लोकसंख्या पाऊण लाखापेक्षा जास्त असून, या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त चार पोलिस कर्मचारी व दोन वाहन चालक यांच्यावर आहे.
अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर पोलिस चौकीचे दैनंदिन कामकाज, विविध कार्यक्रमांची सुरक्षा, कार्यक्षेत्रात घडलेल्या गुन्ह्यांचे तपास आदी कामांचा भार वाढला आहे. परिणामी, चौसाळा पोलिस दुरक्षेत्र कार्यक्षेत्रात चोऱ्यांचे तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
या पोलिस दुरक्षेत्राअंतर्गत चौसाळा बीटमध्ये चौसाळा, कानडी घाट, गोलंग्री, घारगाव, सुलतानपूर, पिंपळगाव घाट, माळेवाडी, रूईगव्हाण, मानेवाडी, लोणीघाट, वाढवणा ही अकरा गावे असून, पालसिंगण बीटमध्ये पालसिंगण, खडकी घाट, जेबापिंप्री, देवी बाभूळगाव, धोत्रा, चांदेगाव, पोतरा, मुर्शदपूर फाटा, रौळसगाव, गोगलवाडी, सातरा, चांदणी, हिंगणी खुर्द, हिंगणी (बु) ही चौदा गावे आहेत.
धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा पोलिस दूरक्षेत्र हे बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असून, याचा काही भाग हा बीड आणि अहमदनगरनगर जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याठिकाणी नऊ ते दहा पोलिस कर्मचाऱ्यांची गरज आहे. या बाबत नेकनूर पोलीस स्टेशन चे सह्यायक पोलीस निरीक विलास हजारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आणि तुम्ही एस.पी. सरांशी बोला हे एस.पी. सरांचे काम आहे असे ते म्हणाले. चौसाळा पोलीस चौकीला तात्काळ कर्मचारी संख्या वाढविण्यात अन्यथा लोकशाही मार्गाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे
चौसाळा पोलिस चौकी ही दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने चोऱ्या आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तसेच मागील अनेक गुन्ह्यांचा आणि चोऱ्यांचा तपास प्रलंबित आहे. त्यामुळे येथील पोलिस चौकीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी करून देखील यागोष्टीकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे