*एक निकाल, लेखणीवर विश्वास दाखवणारा*..!

*भागवत सरकार*..!
*एक निकाल, लेखणीवर विश्वास दाखवणारा*..!
गेल्याच आठवडय़ात महाराष्ट्र राज्यातल्या काही ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालाने लक्ष वेधले आहे. जाहिर झालेल्या निकालात, तरूण रक्ताला वाव मिळेल, असा जनादेश देऊन मतदारांनी नव्या पिढीला एक संधी दिली आहे. वर्षानुवर्ष राजकारणात मक्तेदारी निर्माण करून, आपल्याच घरात पदाचा उपभोग घेणाऱ्यांना मतदारांनी चांगलाच धडा शिकविला. हे एका अर्थाने चांगलेच झाले. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आणि लहानसहान पदांवर काम करायची संधी कर्तृत्ववान लोकांना मिळाली तरच लोकशाहीला अर्थ राहील. म्हणून,कालच्या निकालाने नवा अध्याय निर्माण केल्याचे दिसून येत आहे. मतदाराःनी प्रस्थापितांविरुद्ध कौल देऊन निर्भयपणे तरूणांवर विश्वास दाखविला आहे.
असाच एक निकाल, बीड जिल्ह्य़ातल्या राजकीय इतिहासात नोंद करणारा ठरला. गेवराई जि.बीड तालुक्यातील ठाकर-आडगाव ग्रामपंचायत च्या निवडणूकीत युवा पत्रकार भागवत जाधव यांच्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे. त्यांच्या आई सरपंच पदावर निवडून आल्यात.
गेवराई शहराच्या पूर्वेला अगदी दहा-बारा किमी अंतरावर तीन गावे आहेत. बेलगुडवाडी, कोलत्याची वाडी आणि ठाकर आडगाव. तिन्ही गावांची मिळून एक ग्रामपंचायत आहे. या गावात चौरंगी लढत झाली. कमी वेळात निर्णय घेऊन चांगली फिल्डिंग लावल्याने, भागवत जाधव यांच्यातला युवा राजकारणी दिसून आला.
दै. रिपोर्टर चे वार्ताहर आहेत. संपादक तय्यब भाई, कार्यकारी संपादक गणेश सावंत यांचा ही सपोर्ट मिळाला. आमदार लक्ष्मण पवार यांच्याशी चांगलीच जवळीक राहीली आहे. तरूण पत्रकारांशी चांगला संवाद आहे. त्यामुळे, पत्रकारांची सहानुभूती होतीच.
स्व.विलासराव देशमुख म्हणायचे, एक वेळ विधानसभा निवडणुक सोपी गोष्ट आहे. मात्र, गावची ग्रामपंचायत म्हणजे तारेवरची कसरत असते. जाधव यांनी नियोजन पूर्वक कसरत करत सरपंच पदापर्यंत मजल मारली आहे. ठाकर आडगावचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्याचा फायदा जाधव यांना झाल्याचे दिसते. या गावातून नवख्या असलेल्या जाधवांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने जाधवांचा विजय सोपा झाल्याचे दिसते. खर म्हणजे, जाधव ज्या बेलगुडवाडीत राहतात ते गाव त्यांची कर्मभूमी आहे. त्यांच्या मामाचे गाव आहे. या अर्थाने, आता तिन्ही गावे त्यांची कर्मभूमी म्हणता येतील. कारण, ते गावचे कारभारी झालेत. त्यावर सरकारी मोहर उमटली आहे. जाधव यांचा स्वभाव लवचिक धोरण ठेवून काम करणारा आहे. फार आदळआपट न करता, मध्यम भूमिका घेऊन मार्ग काढण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच, त्यांना गावाने स्वीकारल्याचे दिसते. जाधव सुरूवातीपासून तरूण फळीशी सुरूवातीपासून कनेक्ट होते. कालच्या निवडणूकीत गावतल्या चाळीस-पन्नास तरुणांची त्यांना होता होईल तेवढी मदत झाली आहे.
बाहेरचा उमेदवार सहजा सहजी स्वीकारला जात नाही. असा, इतिहास आहे. किमान गावखेड्यात, अशा परंपरा स्वीकारण्याची अलिखित पद्धत आहे. गावांतर्गत काही प्रश्न असतात. त्यामुळे, नाका पेक्षा मोती जड. या ग्रामीण म्हणीला समोर ठेवून गावातले राजकारण चालत राहते. हे वास्तव बाजुला सारून, बेलगुड वाडीच्या मतदारांनी भागवत जाधव यांना स्वीकारून, राजकारणात नवा पायंडा पाडला. जाधव कुटुंबातला वावर सांप्रदायिक व्यासपीठावर राहिलेला आहे. भागवत यांना तालासुरात पखवाज वाजवता येतो. ऐन मोक्यावर कसा कुठे ठेका धरायचा. या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्यात, या अनुभवातून गावासमोर स्वतःचा पर्याय त्यांनी खूबीने दिला. ही साधी सोपी गोष्ट नाही. राजकारणात खूप बारीक सारीक गोष्टी पाहिल्या जातात. गावातून, एकच एक उमेदवार असावा, तो कुणीही असूदेत. या विषयावर जागर करून, गावाला विचार करायला भाग पाडले. विचाराची घालमेल होत गेली आणि गावाने एक हुंकार दिला. तो हुंकार भागवत जाधव यांच्या नावावर येऊन थांबला. नशीब हे अस असत. गावाने जाधव यांच्या नावावर एकमत दाखविले. तरीही, शेवटपर्यंत जाधव यांनी गाव म्हणत असेल तर मी आहेच. तरीही, गावात आणखी कुणी तरूण पुढे येत असेल तर माझी केव्हाही आणि कधीही बिनशर्त माघार आहे. जाधव यांना गावाने उगीच स्वीकारले नाही. त्या मागे जाधव यांचा भूतकाळ आहे. दहा वर्ष झाली ते पत्रकारितेत आहेत. पेरले ते उगवते. चांगले ते घ्यावे द्यावे. जाधव यांनी
बातमीचा उपयोग गावाला होईल, अशा काही गोष्टी लक्ष देऊन मार्गी लावल्या आहेत. पाठपुरावा करून गावच्या प्रश्नांना त्यांनी सरकार दरबारी मांडले. भल्या पहाटे महसूल प्रशासन गावात आल्याचा इतिहास त्यांनीच प्रयत्नपूर्वक उभा केला. सरकारी दवाखाना, पंचायत समिती, कृषी कार्यालय, तहसील कार्यालयातले प्रश्न मार्गी लागतील, या साठी विशेष लक्ष देऊन ते सोडविण्याचा प्रयत्न केला. निरुपद्रवी पत्रकार म्हणून गावाला त्यांची ओळख झाली. सत्ता मिळवायची, त्यातून पैसा उभा करायचा. पून्हा पैसा खर्च करून सत्ता मिळवायची, असा काळवंडून गेलेला इतिहास मोडून काढण्याचे काम यावेळच्या निवडणूकीत मतदारांनी निर्भय पणे केले आहे. आता यापुढची जबाबदारी निवडून आलेल्या सरपंचाला पार पाडायची आहे.
राज्यात काही ठिकाणच्या नगर परिषदा, ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वाची असते. खर म्हणजे, गावे विकसित व्हायला हवीत. कारण, ग्रामपंचायत ग्रामीण विकासाचा कणा आहे. सरकारने ग्राम स्तरावर सरपंचाला काही अधिकचे अधिकार दिलेत. त्या अधिकाराचा वापर करून काही गावे आदर्श झाली आहेत. हिवरे बाजार ( जि. नगर) राळेगण सिद्धी जि. नगर) पाटोदा (जिल्हाऔरंगाबाद ) या ग्रामपंचायतीचा नावलौकिक झाला आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन काही सरपंच गावाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताहेत. काहींना यश आले काहींना अडचण आल्या. गावातल्या राजकारणाने गावच्या विकासात अडथळे येतात. अहंकाराने गाव विकासापासून दूर जाते. मतभेदाचे रूपांतर मनभेदात होऊन, गावात राजकीय अडवा अडवी करून, वादविवाद घातले जातात. या गोष्टी टाळता आल्या तर किती बरे होईल. समन्वय साधून गावच्या विकास योजना व्यवस्थित राबविल्या गेल्या पाहिजेत. राज्यात काही ठिकाणच्या नगर परिषदा, ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण विकासात ग्रामपंचायतची भूमिकामहत्त्वाची असते. गावे विकसित व्हायला हवीत. कारण, ग्रामपंचायत ग्रामीण विकासाचा कणा आहे. सरकारने ग्राम स्तरावर सरपंचाला काही अधिकचे अधिकार दिलेत. त्या अधिकाराचा वापर करून काही गावे आदर्श झाली आहेत.
अजूनही गाव स्तरावर पाणी, वीज, नाली आणि रस्ता दिसत नाही. हे प्रश्न निटपणाने सुटलेले नाहीत. कारभारी होण्याचा मान ज्यांना मिळाला, अशा सर्व नव्या नेत्यांनी गावचे प्रश्न ऐरणीवर आणून, गावाला नवे रूप द्यावे. नवे मन्वंतर नव्या पिढीच्या हाती शोभून दिसावे. किमान एवढी अपेक्षा असणारच आहे. भागवतजी, तुम्ही सांप्रदायिक कुटुंबातून आहात. संत वचनाचा विसर पडू देऊ नका. माणसाची कीर्ती रहावी म्हणून अनेकांनी खस्ता खात समाजातील असंख्य घटकांचे ऋणानुबंध जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हा इतिहास आहे. आपण आणि आपले सर्व नवनिर्वाचित सदस्य इमानेइतबारे काम करतील, अशी अपेक्षा आहे. एक कवी लिहितो,
कलम तभी साफ और अच्छा लिख पाती है,जब वो थोडा झुक कर चलती है, वही हाल “जिंदगी मे इंसान का है..! छत्रपती शिवाजी राजे म्हणायचे, बहूत काय सांगावे, सुज्ञ असा…!