आदिवासी समाजावर अन्याय थांबवा- जि.प. सदस्य धनराज गाडे
आदिवासी समाजावर अन्याय थांबवा- जि.प. सदस्य धनराज गाडे
मुळा धरण निर्मितीपासून पाण्यामध्ये आदिवासी बांधवांनी मासेमारी करीत आपले उदर्निर्वाह केले. परंतु पाटबंधारे व पोलिस कर्मचार्यांनी संबंधित आदिवासी बांधवांची अडवणूक सुरू केली आहे. आदिवासी बांधवांच्या हक्काच्या रोजगारावर गदा आणल्यास मुळा धरण स्थळी उपोषण सुरू करणार असल्याचा ईशारा जिल्हा परिषदेचे सदस्य धनरााज गाडे यांनी दिला.
नगर जिल्ह्यामध्ये गोड पाण्यातील मासे म्हणून मुळा धरणाच्या माशांना पसंती दिली जाते. धरण स्थळी रात्रीच्या वेळी जाळे टाकून मासेमारी करणारे आदिवासी बांधव धरणस्थळी थांबतात. धरणाच्या तटावर बसून राहत पहाटेच्या वेळी जाळे बाहेर काढून हाती लागणारे मासे बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. त्यातून मिळणार्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबियांचा उदर्निर्वाह होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणस्थळी पाटबंधारे विभाग व पोलिस कर्मचार्यांकडून आदिवासी बांधवांची अडवणूक सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य गाडे यांनी दिली आहे.
आदिवासी बांधवांना मासेमारी करण्यास अडसर ठरणार्या पाटबंधारे व संबंधित पोलिस चौकीत असलेल्या पोलिस कर्मचार्यांना वठणीवर आणण्यासाठी आदिवासी बांधवांसह उपोषण करणार असल्याचा ईशारा गाडे यांनी दिला आहे. आदिवासी बांधवांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य केले आहे. जेव्हा धरणाच्या पाण्यात बुडणार्या असंख्य व्यक्तींना जीवदान देण्याचे काम आदिवासी बांधवांनी केले आहे. वावरथ-जांभळी होडी दुर्घटनेवेळी अनेकांचा जीव वाचविण्याचा पराक्रम मासेमारी करणार्या आदिवासी बांधवांनी केला होता. त्याच आदिवासी बांधवांना प्रशासन त्रास देत असेल तर २० डिसेंबर पासून उपोषण सुरू करणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.