काय ते चोर, आणि काय ते पोलीस… सगळं ओक्के मधी !

बेलवंडी मध्ये पुन्हा चोरी साडेसहा लाखांची रोकड लंपास...
काय ते बेलवंडी, काय ते चोर, आणि काय ते पोलीस… सगळं ओक्के मधी !
बेलवंडी गावातील गुरुदेव बेकरी येथे चोरांनी शटर चे कुलूप कोंडा तोडून ऑफिसच्या कपाटातील लॉकरमधील साडेसहा लाख रुपयांवर डल्ला मारत बेलवंडी पोलिसांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गणेश मारुती बेल्हेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पीएसआय चाटे, पो.हे. कॉ. डी आर. पठारे यांच्यासह ठसे तज्ञ,श्वानपथक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,बेलवंडी येथे चिंभळे रोड वरती बेल्हेकर वाडी येथे गणेश बेल्हेकर यांचा गुरुदेव बेकरी नावाने व्यवसाय आहे.बेकरीमध्ये 17 कामगार काम करत असतात. रात्री दोन कामगार काम करत होते.दुपारी दौलत हिरवे यांच्याकडील पाच लाख रु आणि बेकरी व्यवसायाचे दीड लाख असे साडेसहा लाख रु. बेकरीच्या ऑफिस मधील कपाटात ठेवले होते. दि.30 रोजी मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी बेकरीचे कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करत कपाट उघडून त्यातील रक्कम साडेसहा लाख चोरून नेली.गणेश बेल्हेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पीएसआय चाटे यांच्यासह बेलवंडी पोलीस करत आहेत.
बेलवंडी तील चोऱ्यांची मालिका काही थांबत नाही. मागील चोऱ्यांचा अजून तपास लागत नाही तोपर्यंत 8 दिवसांनी पुन्हा दुसरी चोरी होत आहे. त्यामुळे हे चोर आणि मागील चोर एकच असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. त्यामुळे या चोरांनी चोरी करून पुन्हा एकदा बेलवंडी पोलिसांना चॅलेंज केले आहे.चोरांनी चोरीसाठी बेलवंडी गावालाच जास्त टार्गेट केले असल्याने एक प्रकारे
काय ते बेलवंडी … काय ते पोलिस… आणि काय ते चोर सगळं ओक्के मधी !
असे म्हणायची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक अरविंद माने असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. तसा वचक आता राहिला नाही अशा चर्चा नागरिक उघडपणे करत आहेत.
चौकट – बेलवंडी पोलीस ठाणे फक्त तडजोडी चा अड्डा बनले आहे. मोठ्या प्रमाणात हॉटेलात अवैध दारू विक्री,खुलेआम जुगार, मटका,अशा अवैध धंद्याचे बेलवंडी गाव केंद्र बनत चालले आहे.एकामागे एक चोऱ्या होत आहेत .चोर सापडत नाही याचा अर्थ पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे.
– संग्राम पवार, तंटामुक्ती अध्यक्ष, बेलवंडी
– मागील चोरी झाल्यापासून रात्रीची गस्त वाढवली आहे.एक पोलीस कायम रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत गावात गस्त करत आहे. तरी पण गावापासून 2 किलोमीटर परिसरात चोरी झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि बेलवंडी पोलिसांचे पथक चोरांच्या मागावर असून लवकरच चोर पकडले जातील. नागरिकांनी सतर्क राहावे.
– नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, बेलवंडी पो. ठाणे