अपघात करुन कार घेवून पळून जाताना मोटारसायकलस्वारास धडक; दोन जण ठार,तीन जण जखमी
अपघात करुन कार घेवून पळून जाताना मोटारसायकलस्वारास धडक; दोन जण ठार,तीन जण जखमी
अपघाता नंतर कार चालकासह तिघांचे पलायण
उंबरे ता. राहुरी येथिल माळवाडी शिवारात काल शुक्रवारी (ता. ८) रात्री सातेसात वाजता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर एका भरधाव स्विफ्ट कारने पाच जणांना उडविले. त्यात, दोन जण ठार झाले. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. संजय उर्फ सांडू अर्जुन हिवराळे (वय ३२), कैलास छबुराव पंडित (वय ४५, दोघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी मृतांची नांवे आहेत. सुरेश झुगाजी ससाणे, सोन्याबापू बाबासाहेब गायकवाड, बादशहा शेख (तिघेही रा. माळवाडी, उंबरे) अशी गंभीर जखमींची नांवे आहेत.
शनिशिंगणापूरच्या दिशेने स्विफ्ट कार भरधाव वेगाने चालली होती. मोलमजुरी करुन उपजिविका करणारे सुरेश ससाणे रस्त्याने पायी चालले होते. त्यांना कारने जोरदार धडक दिली. कार चालकाने जखमीला मदत न करता भरधाव वेगाने कार चालवून पळून जाताना शनिशिंगणापूरच्या दिशेने पुढे एक किलोमीटर अंतरावर दोन दुचाकींना कारने जोरदार धडक दिली.
बांधकाम मजुरी करणारे चार जण दुचाकींवर होते. घटनेची माहीती समजताच स्थानिक तरुण सुभाष वैरागर, लालासाहेब वैरागर व इतरांनी मदकार्य केले. दोन रुग्णवाहिकांमधून सर्वांना नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, भरधाव कारने पुढे एका ओढ्यावरील पुलाला धडक दिली. त्यामुळे, कार तेथेच सोडून कारमधील लोकांनी पलायन केले. कारमधील तीन जण पळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
राहुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नगर येथे रुग्णालयात हलविलेले गंभीर जखमी दोन जण उपचारादरम्यान ठार झाले. तीन गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.