ब्रेकिंग

खरंच काळ बदलतोय की पालकत्व….?

खरंच काळ बदलतोय की पालकत्व….?

 

मागील महिन्यातच मी माझ्या इयत्ता सातवीच्या वर्गाचा पालक मेळावा घेतला.वर्गातील 26 पैकी 22 पालक हजर होते.आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबरोबरच इतर सर्व गोष्टींचा आढावा घेऊन झाल्यावर बहुतांश पालकांच्या मनात आणि तोंडातून एकच प्रश्न भेडसावत असल्याच्या माझ्या निदर्शनास आले….तो म्हणजे,मुले वाचनच करत नाहीत…आपल्या पिढीसारखे पाठांतर मुलांचे का होत नाही…? लेखी अभ्यास जेवढा आहे तो दाखवला म्हणजे त्यांचा अभ्यास संपला…का? हुशार असून मुले सर्वांगीण हुशार का होत नाहीत…? असे खरंच होऊ लागले आहे का…? आणि निश्चितच मी ही एक पालक असल्यामुळे मला ते पटले आणि काही प्रश्न मनात आले की,खरंच अत्याधुनिकता येत आहे का..? शिक्षण बदलतंय की शैक्षणिक वातावरण…?शाळा बदलतायेत की शाळेतील आत्मियता….?आणि खरंच काळ बदलतोय की पालकत्व…?

सर्वात आधी विद्यार्थ्यांची वाचन क्षमता कमी झाल्यामुळे आकलन शक्ती ही कमी होत आहे हे नक्कीच एक शिक्षक म्हणून मान्य करावे लागेल.एका पालकाच्या म्हणण्यातून असे आले की “सर आपण आपल्या काळात खूप पाठांतर करायचो,धडे वाचून काढायचो तेव्हा उत्तर लिहिता यायचे,पण आता मुले लगेच मोबाईलचा सहारा घेतात…” आणि मलाही ते पटले की मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे आणि विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे.स्क्रीन टाईममुळे मुलांचा लक्षपूर्वक ऐकण्याचा व एकाग्रता टिकवण्याचा वेळ आणि सातत्य आपोआपच कमालीचे कमी झाले आहे… इंटरनेटवर इन्स्टंट रिझल्ट मिळत असल्यामुळे संयम संपला आहे का…?..तर नक्कीच हो…यासाठी पुढील काही कारणांचा शिक्षक आणि पालकांनी प्रकर्षाने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

1)कल्पनाशक्तीच्या प्रगल्भतेचा अभाव..आजच्या मुलांमध्ये जाणवू लागला आहे.वर्गात कितीही उदाहरणे दिली तरी स्वतःचा कल्पनाविस्तार करण्यासाठी मुले तितकासा विचार करताना दिसत नाहीत.जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा मेंदूत स्वतःच्या कल्पनांनुसार चित्रे उमटवायला सुरुवात होते. या प्रक्रियेला वारंवार व्हिडिओ पहिल्यामुळे खीळ बसली आहे…कारण व्हीडिओमुळे कमी वेळात मुलांना उत्तरे मिळत आहेत.

2)घराघरातील बदलत्या वातावरणाचा प्रभाव…आम्ही लहान असताना घरात वर्तमानपत्रे, मासिके पाहायला मिळायची,मोठी माणसेही काहीनाकाही वाचताना दिसायची.त्यातून स्वतः मुले आपोआप वाचू लागायची.परंतु आता घरात वर्तमानपत्रांची जागा इ-वर्तमानपत्रांनी,ई-बुक्सने घेतल्यामुळे पुस्तकांपेक्षा मोबाईलला तथा गॅजेट्सला महत्त्व प्राप्त झाले आहे.तसेच अभ्यासाचा कठीण विषय समजून घेण्यासाठी मुले युट्युब वरील व्हिडिओना,चॅट जीपीटीला पसंत करतात त्यामुळे त्यांची शोधक वृत्ती नक्कीच कमी झाली आहे.आपल्या काळात पालकांना काही प्रश्न विचारल्यास त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला उत्तरापर्यंत न्यायचे,संवादातून अनेक पर्यायी शब्द आपोआप समजायचे, म्हणी व त्यांचे अर्थ तर कधी पाठच करावे लागले नाही…परंतु आत्ता घराघरातील संवाद संपल्यामुळेही वाचन शक्ती आणि शब्द संपत्ती कमी झाल्याचे नाकारता येणार नाही.

 

3) वास्तवापेक्षा दिखाव्याला महत्त्व दिले जात आहे.. मुले अभ्यास करताना पालक बऱ्याचदा विचारतात की वही दाखव…तू किती लिहिले पाहू दे..तथा मुलेही मी स्वतः तीन पान लिहिले,पाच पान लिहिले म्हणून आनंदी होतात.तसेच शाळेत ही जाणवते.पण आज मी इतके पाठांतर केले ते दृश्य स्वरूपात दाखवता येत नसल्यामुळे मुलांनीही हेच हेरले नसावे का..? वर्गातही मी इतरांपेक्षा कसे व्यवस्थित लिहिले हे दाखवण्यासाठी मुले गुगलचा वापर करून इत्यंभूत कॉपी करताना दिसत आहेत.तसेच लिहून ठेवले की माझी जबाबदारी संपली.मग पाठांतर व आकलन नाही झाले तरी चालेल अशी ही सुप्त भावना मुलांच्या मनात तयार झाली आहे.हे आजच्या पालकांचे उद्गार आहेत..

4)नव्या जुन्या शिक्षण पद्धती..मी लहानपणी तिकिटे गोळा करणे,चित्र काढणे,डायरी लिहिणे,नाण्यांचा संग्रह करणे असे शोधक प्रकल्प केले आहेत पण आज मुलांना फोटोग्राफी,व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर लाईक्स मिळवणे हे अभिमानाचे वाटू लागले आहे..सातवीच्या मुलांचे ही इंस्टाग्राम वर अकाउंट्स असल्याचे हे बीज खेडोपाडी पोहोचले आहे.

5)मैदानी खेळांची जागा ऑनलाईन गेम्स ने घेतली आहे…आमची पिढी लहानपणी मैदानावर विटी दांडू,टायर,सायकल चालवणे,सूरपारंबया खेळणे,लपाछपी खेळणे अशा खेळात व्यस्त असायची ज्यातून न शिकवता खूप काही आम्ही शिकलो पण आत्ताची पिढी अनेक तास ऑनलाईन गेम्स,व्हिडिओला लाईक-फॉलो करणे,कमेंट करणे,मित्रांना अनावश्यक लिंक्स शेअर करणे व डिस्टर्ब करणे यात व्यस्त नाही का..? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारावा.आम्ही लहानपणी दिवसदिवस मित्राच्या घरी,गावात भटकलो आहे त्यातून अनेक ज्ञान आम्ही अनुभवातून घेतले आहे.आज किती मुले सुट्टीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन धिंगाणा घालतात.(धिंगाणा या अर्थी भरपूर खेळ,नातेसंबंध, अंगतपंगत,गटाने अभ्यास,मदत,एकत्र कामे,स्वानुभव वगैरे.)

6)खूप काही शिकण्याच्या नादात मूळ संस्कारांना कितपत महत्व दिले जात आहे..हा तर संशोधनाचाच विषय आहे आजची मुले इंटरनेटमुळे भयंकर उपलब्धता असल्याने कोडिंग करतील,व्हिडिओ एडिटिंग करतील,ग्राफिक्स,पॉडकास्ट शिकतील,परदेशी भाषा शिकतील..पण त्यांना आपल्या मातृभाषेतील साधे शब्द आठवतात का..? खरंच संस्कारक्षम ते घडतायेत का..? किती मुले आई-वडिलांचा,वडीलधाऱ्यांचा आदर करतात…?आई-वडिलांना जपतात…?आदर्श भावना त्यांच्या मनात कितपत जागरूक होत आहेत..?,की ते एकलकोंडे,स्वार्थी,भावनाशून्य,परावलंबी होत आहेत हे ही पहावे लागेल.

7) घरातील नात्यांचे व संवादाचे स्वरूप वेगाने बदलत चालले आहे.. आम्ही नववी दहावीला असतानाही शिक्षकांचा आणि पालकांचा मार खाऊन मोठे झालो आहोत पण आदर कधीच कमी झाला नाही… घरातील एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घर हे एकत्र येण्याचे,सुखदुःख वाटून घेण्याचे,हक्काचे ठिकाण होते.एकत्र जेवण म्हणजे दिवसभराचा गोड शेवट असायचा.सर्व ज्येष्ठ आपले स्वतःचेच आम्ही मानले पण आता एकाच घरात वेगवेगळ्या भिंती तयार झाल्या नाहीत का..? एकाच घरात राहून आपण घरातील सर्वांशी किती व कसे बोलतो..?यावर खूप मोठे लिखाण होऊ शकते..आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण बनत चालले आहे… अनावश्यक वस्तूंच्या स्पर्धेमुळे मुलांमधील संयम,सहिष्णुता,जाणीव,प्रेम,आपुलकी हे केव्हाच संपले आहेत की ज्याची आवश्यकता त्याला जडणघडणीत भासणार आहे.आणि याचमुळे मुलांमधला मूळ स्वभाव झपाट्याने बदलत चालला आहे.

8)या सर्व कौटुंबिक तथा सामाजिक कारणांबरोबरच कायदेशीर बाबीही याला अडसर ठरत आहेत का..? हाही विचार मनात येतो..मुले ऐकतच नाहीत असा पालकांचा सूर होता.सर तुम्ही बिनधास्त मुलांना हाणा,मारा,धाक लावा,माझं लेखी घ्या…पण मुलं सुधारले पाहिजेत…! यातून मुलांची भीती संपत चालली आहे,त्यांचे संस्कार,छंद,शाळेची व शिक्षकांची भीती इ.कमी होऊ लागले आहे..आठवीपर्यंत मी काहीही केले नाही तरी पास होणारच आहे,आता हे प्रत्येक मुलाला समजले आहे त्यामुळे नववीत बसणारा जबरदस्त शैक्षणिक धक्का कसा असतो हे फक्त शिक्षक आणि मुलाचे आई-वडीलच सांगू शकतील. शैक्षणिक दर्जा यामुळे खालावल्याचे अनेक वेळ पालकांतून मी ऐकले आहे.

अशा या असंख्य कारणांवर तथा गंभीर समस्यांवर उपाय म्हणून मी काही नकळत बदल वर्गात करण्याचे ठरवले व त्याचा अतिशय सकारात्मक बदल मला वर्गात आणि मुलांमध्ये जाणवला त्यातील काही उपक्रम तथा उपाय पुढीलप्रमाणे.

1)विद्यार्थ्याने आठवड्याला एक अवांतर पुस्तक वाचून व त्यावर दहा मिनिटे व्यक्त व्हायचे.

2)जो विद्यार्थी समजलेल्या सर्व घटकाचे आपल्यासमोर समक्ष सादरीकरण करत असेल त्याला कोणत्याही प्रकारच्या लिखाणातून सूट दिली जाईल.असे केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे माझ्या लक्षात आले.बेसिक गणितावर मुले स्वतःच्या क्षमतेने ज्ञानरचनावादी क्रिया आपोआप करायला लागले.

3) दररोज वर्गात हजेरीनंतर घरातील वातावरणावर चर्चा केली, घरचा अनुभव आम्ही शेअर करतो.

4) अनेक टास्क देऊन अशा प्रसंगांना कसे तोंड देशील याबाबत चर्चात्मक उपक्रम घेतले.

5) स्वतःच्या मनाने अभ्यास करतील असा नाविन्यपूर्ण अभ्यास दिला व करून घेतला यामुळे एकही उत्तर रिपीट होत नाही व मुले स्वतःचा नावीन्यपूर्ण विचार करायला लागली.

6) पालकांनी मुलांसमोर मुद्दाम वर्तमानपत्रे तथा पुस्तके वाचायला घ्यावीत हे पाहून मुलेही घेतील.मोबाईल न घेता त्यांना घरातील चर्चेत जाणीवपूर्वक सहभागी करून घ्यावे.

7) पालकांनी मुलांना महागड्या वस्तू तथा गॅझेट्स देण्यापेक्षा तुमच्या स्वतःचा फुकटचा वेळ जर दिलात तर तुमच्या सोबतचे ते क्षण मुले कधीच विसरत नाहीत हा विश्वास पालकांमध्ये जागृत केला.

8) मोबाईल हातात घेतल्यास लगेच शिक्षकांना फोन करणे,पालकांनी मोबाईलची सेटिंग चेंज करून घेणे हेही पर्याय वापरले.

9) एक सुंदर उपक्रम असा घेतला की मी आज दररोज काय शिकलो तथा कोणता संस्कार मला दिवसभरात(कुठेही)मिळाला हे फक्त एका ओळीत दररोज लिहायचे.याचे सर्व मुलांनी सुंदर लेखी ठेवले.

10) मूल्यमापन पद्धतीतही लेखी तंत्रांऐवजी स्वानुभव,सादरीकरण,संस्कारक्षमता तथा प्रकल्प या तंत्रांचा भारांश वाढवला..

11) चॅलेंजर ऑफ द विक हा अतिशय परिणामकारक उपक्रम वर्गात सुरू केला.यामध्ये दर शनिवारी एक टास्क दिला जाईल तो आठवडाभर त्याने प्रयत्नपूर्वक पूर्ण करून पुढच्या शनिवारी सादर करायचा.जो विद्यार्थी यशस्वी सादरीकरण करेल तो चॅलेंजर ऑफ द विकचा विनर ठरेल.

उदा.1-100 पर्यंतच्या संख्याचे वर्ग पाठ करणे,पूर्ण आठवड्यात मोबाईल हातात घेण्याचा कमीत कमी कालावधी ज्याचा असेल तो विनर.याखेरीज नाविन्यता आणता येईल.

समस्त वाचक हो मुले ही आपल्या स्वतःची,गावची व राष्ट्राची खरी संपत्ती आहे. ही पिढी संस्कारक्षम घडली तरच आपले कुळ ते राष्ट्राचा उद्धार होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांना जे काही देता येईल ते कोणतेही कारण न सांगता सुनियोजित पद्धतीने देण्याची जबाबदारी आपली आहे.हे पालकांनी आणि शिक्षकांनी ओळखणे गरजेचे आहे…!

 

 

द्वारा –

नाव – श्री गोसावी वैभव दत्तात्रय

शाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नपावाडी,ता.-राहाता,जि.-अहिल्यानगर

पद – पदवीधर शिक्षक

संपर्क क्र.- 9860477975

ईमेल – vaibhav75gosavi@gmail.com

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे