७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी पत्नी नको पत्नी पिडीत पुरुषांकडून पिंपळपौर्णिमा साजरी

७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी पत्नी नको
पत्नी पिडीत पुरुषांकडून पिंपळपौर्णिमा साजरी
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. उद्या म्हणजेच मंगळवारी (14 जून) वटपौर्णिमेचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र औरंगाबादेत वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरूषांनी आज पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे
पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देत औरंगाबादेत पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पूजन केले आहे. औरंगाबादेतील वाळूज परिसरात पत्नी पीडित पुरूषांनी ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.
वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पिंपळपौर्णिमा साजरी करण्याबाबत पुरूषांनी सांगितले की, ‘आमचं नेमकं दु:ख असं आहे की, ज्यावेळेस आम्ही आशेनं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर बायको जेव्हा भांडणं सुरू करते. आणि हे भांडणं जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत जातं, तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाही. ज्यावेळेस पोलीस आम्हाला मदत करत नाही, त्यावेळी आम्ही समाजातून बाहेर फेकलो जातो. पुढे न्यायव्यवस्थाही आमची मदत करत नाही. पत्नी एकतर आमच्याकडे नांदत नाही, आणि नांदली तर ती सुखाने जगू देत नाही’. अशी व्यथा या पुरूषांनी मांडली आहे.
उद्या (मंगळवारी) वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वटपौर्णिमेचे पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. मात्र, वटपौर्णिमीच्या पहिल्या दिवशी पत्नी पीडित संघटनेच्या सदस्यांनी आणि पत्नीपीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी करून अशी भांडखोर पत्नी कधीच नको, अशी प्रार्थना केली.