कमलपूर येथील श्रीरामपूर वैजापूर तालुक्यांना जोडणारा रस्ता वाहून गेला
कमलपूर येथील श्रीरामपूर वैजापूर तालुक्यांना जोडणारा रस्ता वाहून गेला
टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यांना जोडणारा कमालपुर येथील नदीच्या बंधाऱ्यावर असलेला रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे. तर मूलभूत गरजांसाठी नागरिकांना पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव, चेंडूफळ, वाहेगाव, मांजरी आदी गावातील नागरिकांचे श्रीरामपूर तालुक्यात शेती निगडित दळणवळण आहे. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रस्ताच वाहून गेला आहे. वाहनाने तर सोडाच पायी चालणे ही जिकरीचे झाले आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्याचा श्रीरामपूर तालुक्याशी संपर्क तुटला आहे. परिणामी महिला वर्गांना आठवडे बाजार, शेतकऱ्यांना कांदा विक्री, दूध व्यवसाय विक्रीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. व आर्थिक फटका बसत आहे तर आजारी रुग्णांच्या बाबत मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
ʻʻआम्हाला वैजापूर, गंगापूर व औरंगाबाद दळणवळणासाठी लांबचा पल्ला ठरत असल्यामुळे आम्ही श्रीरामपूर तालुक्याला पसंती देत असतो मात्र दोन तालुक्याला जोडणारा रस्ताच वाहून गेल्यामुळे आमचे अतोनात हाल होत आहे. दोन्ही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम तातडीने करून देऊन आमच्या समस्या सोडवाव्यात – भारत पवार, प्रगतिशील शेतकरी चेंडूफळ