आईच्या “खुरप्यावर” खाकीची मोहर..!

आईच्या “खुरप्यावर” खाकीची मोहर..!
इंजीनिअर झाल्यावर ही मनासारखा जाॅब मिळत नव्हता. मिळाला तरी मनात विचार घोळत राहायचे. मग, जवळचा एक मित्र म्हणाला , हे बघ बदाम, मला वाटत तू स्पर्धा परीक्षा द्यावीस. मनाला ही पटले आणि स्पर्धा परीक्षेसाठी गाव सोडले. थेट पुणे गाठले. जशी परिस्थिती येईल तशी स्वतःची सोय करून दिवस काढले. कधी अर्धपोटी तर कधी
उपाशी राहून दिवस मोजले. अभ्यास केला. जातील हे दिवस. मनाने मनाची समजूत काढली. दु:खाचे दिवस सोसले तसा भाग्याचा दिवस ही आला. 2021 च्या परिक्षेचा निकाल लागला. आईच्या कष्ट कामाले आले. श्री. बदाम शोभा छगनराव सिरसाट मु. पो. वडगाव ता. गेवराई जि.बीड [मराठवाडा] यांची पीएसाय म्हणून निवड झाली. गावाला आनंद झाला. गावची “शोभा” वाढली. पोलीस आयुक्त विनायक ढाकणे यांचा आदर्श घेऊन पुढे जायचा प्रयत्न केला.
मराठवाड्यातल्या मराठी मुलांनी स्पर्धा परीक्षेत सातत्य ठेवायचा प्रयत्न चालवलाय. त्यात ते यशस्वी वाटचाल करीत आहेत. ही गौरवास्पद बाब असून, गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील भूमिपुत्र बदाम शोभा छगनराव सिरसाट यांनी 2023 च्या निकालाने ते फौजदार झालेत. बदाम सिरसाट यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात झालेले. त्यांनी पुढे उस्मानाबाद येथे 2014 साली इलेक्ट्रॉनिक विषयात इंजिनियरिंग केले. तेथून पुढचा प्रवास स्पर्धा परीक्षेचा राहीला. सातत्य ठेवून सहाव्या वेळी त्यांना यश लाभले. 2020 साली दिलेल्या परिक्षेने त्यांना 2023 साली फौजदार केले आहे. त्यांना मिळालेल्या यशाने गाव आनंदी झाले आहे. जिथे कर्तव्य पार पाडायची संधी मिळेल, तिथे त्यांना मुलींना निर्भय होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे.
आई – वडलांच्या काबाडकष्टाची जाणीव ठेवून पाऊल वाट तुडवून, बदाम सिरसाट यांनी जिद्दीने पुढे जाऊन यश संपादन केले आहे. प्रयत्न करत राहीले. शेवटी यश मिळाले.
काही मुल खूप चिकाटी दाखवतात. मैदान सोडायचे नाव घेत नाहीत. त्यांना ध्येयापर्यंत पोहचायचे असते. तसा, ते निश्चय करतात. शोभाताईंचा बदाम या गोष्टीला अपवाद कसा राहील. त्याने ही अभ्यासाच्या बळावर खाकीवर नाव कोरले आहे. वडगाव ढोक त्यांच्या मामाचे गाव आहे. या माय-लेकरांना
मामाच्या गावाने आसरा दिला. त्याच गावात आईने मोलमजुरी करून मुले मोठी केलीत. खुपन-टूरपन करून उदरनिर्वाह केला. मोलमजुरीचे जमा करून ठेवलेले पैसे शोभाताई बदाम यांना पाठवायच्या. पैसे फार नसायचे. त्यावरच भागवावे लागे. पुण्यात महानगरपालिकेच्या शासकीय अभ्यासिका मोफत असतात. तिथेच अभ्यास केला. त्याच ठिकाणी एका कोपर्यात झोपायची व्यवस्था केली. रोज सकाळी पहाटे उठून अभ्यास करायचा. रोज दहा बारा तास अभ्यास करून, यशापर्यंत जायचा प्रयत्न केला. पाच वेळा कमी पडलो. पडलो तरी उठलो. पून्हा पळालो, पून्हा उठलो. पळता पळता चुका शोधल्या. त्यावर मात करुन सहाव्या वेळी यश पदरात पाडून घेतले. बदाम सिरसाट आनंदाने सार काही सांगत होते. या क्षेत्रात करिअर करणार्यां मुलांनी बेस पक्का करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. बेस पक्का असला म्हणजे अडचण येत नाही. पहिली ते 10 वी. पर्यंत च्या पुस्तकांचा पारायण सोहळा करता आला पाहिजे. रोज एखादे वर्तमानपत्र, गणित, इतिहास, भूगोल,
विज्ञानाच्या पुस्तकांना वेळ दिला पाहिजे. रोज किमान दहा तास अभ्यास करता आला पाहिजे. चांगले मित्र आणि अभ्यासाचे सूत्र ठरवणारी चर्चा आवश्यक असते. परिस्थिती हलाखीची असूदेत, खचून जायचे नाही. गरीबीची खंत वाटतेच. मात्र, ती उघड करायची नाही आणि त्या विषयी फार चिंता करायची गरज नाही. कोणी तरी भेटतेच.
मला मित्रांनी सपोर्ट केला. त्यांनीच आधार दिल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणारे नूतन पीएसाय बदाम सिरसाट यांना ही समाजातील वंचित घटकांपर्यंत जायचे आहे. त्यांना मदत करायची आहे. या यशात आई, वडिल, मामा मामी, आजी, भावंड, मित्रांचा वाटा आहे.
अपयशाने खचायचे नाही. त्या पेक्षा बी प्लान तयार ठेवा. काही बिघडत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे, दारिद्र्याच्या साणेवर शौर्याला धार चढते. या अर्थाने, बदाम शोभा छगनराव सिरसाट या तरूण वयातल्या युवकाने मेहनत, चिकाटी, समायोजन साधून ध्येयापर्यंत जाऊन यश मिळवून,
आईच्या हाती असलेल्या खुरप्यावर “खाकी” ची मोहर उमटवली आहे. ग्रामीण भागातील मराठी मुलांचे हे यश नवी पाऊलवाट आहे.