प्रेमी युगलांचा पोलीस ठाण्यात गोंधळ, आई बापांचा टाहो अन मुला मुलींचे लफडे.! लाजा सोडून लग्न
प्रेम युगलांचा पोलीस ठाण्यात गोंधळ, आई बापांचा टाहो अन मुला मुलींचे लफडे.! लाजा सोडून लग्न
गेल्या आठवडाभरात अकोले पोलीस ठाण्यात चार प्रकरणांनी प्रचंड गोंधळ घातला आहे. मुला-मुलींनी पळून जायचे, कोण्या मंदीरात लग्न करायचे आणि चारदोन दिवस मौज मजा करुन पुन्हा घरी यायचे. तोवर दोन्ही घरचे पालक-नातेवाईक व्हेन्टीलेटवर असतात. मात्र, लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळलेली लेक भर पोलीस ठाण्यात म्हणते मला आई बाप नको, मी जगेल तर याच्या सोबत अन मरेल ते सुद्धा याच्यासोबत, तेव्हा खर्या अर्थाने आई-वडिलांच्या डोळ्यासमोर अंगाखांद्यावर खेळणारी ती चिमुकली पाऊले थुईथुई नाचु लागतात, लेक जेवली नाही म्हणून उपाशी राहणारा बाप अन मुलगा शाळेतून आला नाही म्हणून वाटेकडे डोळे लावून बसलेली आई हे सगळं आयुष्य अगदी काही क्षणात डोळ्यासमोर चलचित्रासारखं फिरतं आणि भर पोलीस ठाण्यात एकच टाहो फुटतो. नऊ महिने नऊ दिवसांची परतफेड, दुधाचे उपकार आणि लेकरं स्वत:च्या पायावर उभी रहावी म्हणून बापाने आयुष्यभर केलेली धडपड हे सगळं मातीमोल होतं आणि काही क्षणात पायाखालची वाळु सरकुन जाते. का? तर म्हणे आम्ही आमचा निर्णय घेण्यास सक्षम झालो आहोत असे म्हणत खुद्द पोटची मुलगी पोलीस ठाण्यात लेखी देते. की, मला माझ्या आई वडिलांपासून धोका आहे. तेव्हा हाताश होऊन सगळं काही संपल या भावनेने ते चालते होतात. ही स्थिती गेल्या वर्षभरात अकोल्यातच नव्हे.! राज्यात आणि देशात पहायला मिळत आहे. म्हणून मुलांनी सक्षम व्हा आणि कुटुंबाच्या सहमतीने लग्न करा असे आवाहन तरुणांना सुज्ञ व्यक्तींनी केले आहे.
आई-वडिल झाले गुन्हेगार.!
जन्म दिला, लहानचे मोठे केले, स्वत:च्या पोटाचा चिमटा घेऊन यांचे लाड पुर्ण केले, शाळेत घेतले, यांनी आकाशात मुक्तछंद विहंग करण्याचे स्वप्न पाहिले. हेव ते स्वतंत्र्य दिले अन यांनी त्याचा अशा प्रकारे गैरवापर केला. शिकावं म्हणून कॉलेजला पाठविले पण यांनी प्रेमाचे धडे गिरविले. अभ्यास करावा म्हणून मोबाईल दिला पण यांनी चॅटींग आणि कॉलिंग सुरू केली. आई लोकांच्या बांधावर अन वडिल काळ्या मातीत राबत असताना यांनी घरातून पळ काढला. लेकरु कोठे गेलं म्हणून सगळं रान पिजलं अन अचानक पोलीस ठाण्यातून फोन आला. तुमच्या मुलीने लग्न केलं असून माझ्या आई वडिलांपासून मला आणि माझ्या नवर्याच्या धोका आहे अशी तक्रार दाखल केली आहे. तेव्हा खर्या अर्थाने आपण असल्या मुलांना जन्म देऊन गुन्हेगार ठरलो अशी भावना त्या माय माऊलीची होते.
प्रेमाला विरोध मुळीच नाही.!
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज म्हणतात. की, प्रेमाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. पण, दोन्ही व्यक्ती किमान स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभ्या असणे आवश्यक आहे. मुलगा आयएएस आणि मुलगी आयपीएस आहे, अशा प्रेमाला कोणीच विरोध करु शकत नाही. स्वत:चे आयुष्य स्वत:ला सक्षमपणे जगता आले पाहिजे. आई-बापाच्या जिवावर जगणार्यांनी प्रेम करावं आणि लोकाच्या लेकराच्या आयुष्याचे वाटोळे करण्याचा अधिकार कोण्या येड्या गबाळ्याला नाही. त्यामुळे, सर्वात पहिले शिक्षण, त्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहणे आणि त्यानंतर समाजमान्य प्रेम हे आपला समाज समजुन घेऊ शकतो. मात्र, भिकार प्रेमामुळे आज समाजस्वास्थ्य बिघडून गेले आहे. म्हणून आपली भारतीय संस्कृती टिकविणे आणि आपल्या आई वडिलांना न दुखावता निर्णय घेणे यास मुलांनी प्राधान्य दिले पाहिजे.
अल्पवयीन विवाह, हा गुन्हाच.!
मुलीचे वय १८ वर्षे नसेल तर ती अल्पवयीन आहे असे कायदेशीर मानले जाते. जेव्हा ती घराबाहेर स्वत:हून पळुन जाते किंवा तिला पळुन नेले जाते. तेव्हा मुलीचे अपहरण झाले अशाच प्रकारचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाचे आहे. या दरम्यान मुलीची छेडछाड किंवा अत्याचार झाला असेल बाल लैंगिक अत्याचार म्हणून गुन्ह्याची नोंद होते. यासाठी पालकांची फिर्याद फार महत्वाची असते. अन्यथा पोलीस किंवा सरकारी व्यक्ती फिर्याद नोंदवत असतात. अकोले तालुक्यात बाललैंगिक अत्याचार या प्रकाराची सर्वात जास्त गुन्हे दाखल आहेत. म्हणून हुशार प्रेमी मुलीचे वय १८ वर्षे झाले की दुसर्या दिवशी लग्नाचे उपक्रम राबवितात. बाललैंगिक अत्याचार प्रकरणात लवकर जामीन मिळात नाही तर काही खटले अगदी अंडरट्रायल देखील चालतात आणि त्यात शिक्षा देखील होते. त्यामुळे, अशा भयानक गुन्ह्यांबाबात तालुक्यात कोणतीही जागरुकता नाही. मात्र, तरी देखील गुन्हा कोणताही असो ते कोणे चुकीचेच आहे.
घेतलेला निर्णय सिद्ध करुन दाखवा.!
मुळात प्रेम ही संकल्पना एखाद्या व्यक्तीला लुळी-पांगळी करणारी नाही तर बळ देणारी आहे. त्यामुळे, कुटुंबाच्या विरोधात जाऊन जरी निर्णय घेतला असेल. तर, तो सिद्ध करुन दाखविण्याची जबाबदारी दोघांनी घेतली पाहिजे. चार दिवस सासुचे अन चार दिवस सुनेचे झाल्यानंतर घरात गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन विशेष म्हणजे, ज्या आई बापांची मान चार चौघात खाली घातली ती पुन्हा उंचविण्याचे सामर्थ्य दोघांनी ठेवले पाहिजे. अन्यथा सासु एकपट तर सुन दुप्पट त्यामुळे, घरात रोज भांडण आणि नंतर कोणाचीतरी आत्महत्या. असे हजारो नव्हे.! लाखो उदा. आहेत. त्यानंतर गुन्हे, जेल अन कोर्ट कचेर्या यातच संपुर्ण आयुष्य निघून जाते. त्यामुळे, एकमेकांना समजून घ्या, जो निर्णय घेतला तो चांगला कसा होता हे समाजाला पटवून द्या. जशी विकृत उदाहरणे आहेत त्यापेक्षा जास्त प्रेम विवाह यशस्वी झाल्याची देखील चांगली उदा. आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जागातले कोणतेच आई वडिल आपल्या लेकरांचे वाईट व्हावे असे चिंतू शकत नाही. म्हणून त्यांना दुखावू नका आणि त्यांच्या विचारांच्या विपक्ष वागू नका बस इतकेच.!
तुम्ही मुलांशी नितळ मैत्री ठेवा.!
खरंतर पुर्वीपासून मुला मुलींना धाकात धरण्याची सवय होती. शाळेत गुरुजी मरेपर्यंत मारायचे तरी पालक गरुजींना ब्र शब्दाने बोलत नव्हते. आज केव्हढं कौतूक आलं आहे. एक छडी दिली तरी शिक्षक निलंबित आणि जेलमध्येही जातो. त्यामुळे, घरापासून ते शाळेपर्यंत जो धाक होता तो शुन्य राहिला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी कमवतोय तर मुलांसाठी. त्या कमाईपाई मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बाप कमवतोय अन मुलगा दारु पितोय, बाप काटकसर करतोय अन मुलगी मुलींना फिरवतोय, आई रोज शेतात राबतेय, घामाचे पाणी करतेय अन मुलगी फेशल, क्लिनर करतेय. कशासाठी? जाणिव आणि कर्तव्य यात फार मोठे अंतर पडले आहे. कालचा श्रवणबाळ आणि आजचा नुसता बाळ यात जमिन आसमान इतका फरक पडला आहे. त्यामुळे, दोन पैसे कमी कमवा. पण, आपल्या मुलांशी बोला, फावला वेळ त्यांच्याशी खेळा, त्यांच्याशी मैत्री करा, चांगली पुस्तके आणि जगण्याला व निर्णय क्षमतेला पुरक असे विचार त्यांना द्या. त्यांना आपले प्रेम, भावना, राग, द्वेष सर्व काही आपल्या सोबत सहज शेअर करता येईल इतकी नितळ, निर्मळ व प्रांजळ मैत्री करा. यातूनत असल्या वायफट प्रेमाला पुर्णविराम मिळेल. अन्यथा मुलगी डॉक्टर आणि बिगाऱ्यासोबत प्रेम हे असले प्रकार घडतच राहणार आहे.