अतिक्रमण विरोधी कर्मचाऱ्यांकडून दुजाभाव कारवाईची मागणी
अतिक्रमण विरोधी कर्मचाऱ्यांकडून दुजाभाव कारवाईची मागणी
शहरातील अक्षय कॉर्नर येथील फळ विक्रेत्यांवर कडक कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदानात म्हटले आहे की, शहरातील अक्षय कॉर्नर येथे शुक्रवारी आठवडा बाजार भरतो. सदर बाजारातून श्रीरामपूर कडून संगमनेर रोडला जोडला जाणारा रस्ता अक्षय कॉर्नर येथून जातो. बाजार निमीत्त तालुक्यातील अनेक गावामधून शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात. व अनेक शेतकरी अक्षय कॉर्नर या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी बसतात.
मात्र नगर पालिकेचे अतिक्रमण विरोधी कर्मचारी सदर शेतकऱ्यांना या ठिकाणी बसू देत नाही.रस्त्यात अडचण होते. वाहतुकीस अडथळा होतो असे कारण देऊन शेतकऱ्यांना हुसकावून देतात. अनेकदा शेतकऱ्यांना शेतमाल हिसकावून ट्रॅक्टरमध्ये टाकला जातो किंवा त्यांना दंडाची धमकी दिली जाते.
परंतू सदर अक्षय कॉर्नरवर दुपारी तीन ते चारच्या सुमारास अनेक फळ विक्रेते आपल्या हातगाड्या आडव्या तिडव्या लावून त्यांच्या मालाची विक्री करतात. त्यांना मात्र पालिका कर्मचारी काहीही म्हणत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. सदर फळ विक्रेते तेथे ग्राहकांना तसेच ये-जा करणाऱ्या वाहनांवर दादागीरी करत असतात. अनेकदा मांडणे व मारामाऱ्या करतात. तरी अक्षय कॉर्नर या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बसू द्यावयाचे नसेल तर तेथे फळ विक्रेत्यांनाही बसू देवू नये.
सदर फळ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व सदरचा रस्ता हा वाहतुकीसाठी रिकामा करण्यात यावा, अन्यथा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश बेग यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अशोक तुपे, प्रकाश मेहत्रे, सागर शेटे, लखन माखिज, वाल्मीक भुजाडी, सुनिल शेळके, राजेश वाव्हळ, राजेंद्र अनाप, प्रसाद दळवी, सोहम लगे आदींच्या सह्या आहेत.