प्रसाद शुगर कडील ऊस दर फरकाची बिले एकसमान अदा करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश
सलग चार वर्षांच्या संघर्षानंतर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश
प्रसाद शुगर कडील ऊस दर फरकाची बिले एकसमान अदा करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
सलग चार वर्षांच्या संघर्षानंतर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण
पुणे /अहमदनगर /श्रीरामपूर :- प्रसाद शुगर अँड अलाईड ऍग्रो प्रॉडक्टस लि.वांबोरी ता.राहुरी या साखर कारखान्याने सन २०१८/१९च्या गाळप हंगामात श्रीरामपूर, नेवासा व परिसरातील गाळप केलेल्या उसाला राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादकांपेक्षा प्रमेट २२१/- रू. कमी ऊस दर दिला होता. एकसमान ऊस दराबाबत कायद्यातील तरतुदींनुसार फरकाची प्रमेट २२१/- रू. मिळावे यासाठी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य श्री.बाळासाहेब पटारे यांचे नेतृत्वाखाली प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय अहमदनगर, कारखाना कार्यस्थळ व प्रसाद शुगरचे अध्यक्षांच्या घरापुढे आंदोलने करून लक्ष वेधण्यात आले होते.आंदोलनातील मागणीची दखल घेऊन प्रथमतः प्रादेशिक साखर कार्यालय व नंतर साखर आयुक्त, पुणे यांनी उभयपक्षी सुनावणी घेतली. सुनावणी कामकाजादरम्यान शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांनी शेतकऱ्यांची कायदेशीर बाजू मांडताना, मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचेकडील याचिका क्रमांक ४१६२/९८ खालील दिनांक ०२/०८/२०१० चे आदेश सादर करून, साखर कारखान्याला एकाच हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी वेगवेगळे दर देता येत नाहीत असे निदर्शनास आणून दिले. परंतु मा. न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार साखर आयुक्तांना नाहीत या स्वरूपाची हरकत साखर कारखान्यांच्या वतीने घेण्यात आल्याने, साखर आयुक्तांनी याबाबतचा निर्णय अनिर्णीत ठेवून याप्रकरणी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागितला. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने एकाच हंगामात गाळपाच्या ऊसाला असमान दर देता येणार नाही असे स्पष्ट केल्याने, त्यानुसार साखर आयुक्तांनी दिनांक १३जून २०२२रोजी निर्णय घेऊन, प्रसाद शुगरने हंगाम २०१८/१९चे ऊस बिले एकसमान अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०१८/१९ गाळप हंगामात प्रसाद शुगरने एकूण ५ लाख ०७ हजार ९३२मे.टन उसाचे गाळप केले. कारखान्याकडून प्रथम प्रमेट २१००/- रू. प्रमाणे ऊस बिलाचा पहिला हप्ता देण्यात आला. या हंगामात कारखान्याला गाळपासाठी ऊस कमी असल्यामुळे प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाने नजीकच्या श्रीरामपूर,नेवासा व परिसरातील शेतकऱ्यांना कारखाना हंगामअखेर अंतिम दर देणार असल्याचे सांगून, तसेच आमचा अंतिम दर किंवा अशोक कारखान्याचा दर यापैकी जो दर जास्त असेल तो भाव देऊ असे आश्वासन देऊन या भागातील सुमारे १ लाख ९०० मे.टन ऊस गाळप केला. मात्र ऑक्टोबर २०१९ मध्ये फक्त राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच प्रमेट २२१/- रू. प्रमाणे अंतिम ऊस बिले दिली. त्यामुळे राहुरी परिसरातील शेतकऱ्यांना प्रमेट २३२१/- रू. व उर्वरित शेतकऱ्यांना मात्र प्रमेट २१००/- रू. असा भेदभाव करण्यात आला.प्रमेट २२१/- रू. प्रमाणे फरकाची ऊस बिले मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे मारूनही कारखाना व्यवस्थापन टाळाटाळ व उडवाउडवी करीत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. आंदोलनाला अखेर यश येऊन, साखर आयुक्तांनी फरकाची प्रमेट २२१/- रू. प्रमाणे रक्कम हंगामातील एकूण गाळपाच्या ऊसाला ३०दिवसात एकसमान अदा करण्याचे प्रसाद शुगरला आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, ऊस उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सक्रिय आंदोलनातील शेतकरी श्री.संजय नामदेव उंडे, साहेबराव पटारे, संजीव रायभान उंडे,मारुतराव पटारे,वाल्मीकराव भोसले, नामदेव गायके, योगेश उंडे, द्वारकानाथ जोशी, प्रमोद उंडे, दत्तात्रय सयाराम उंडे, श्रीकृष्ण वेताळ आदींनी शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे यांचे अभिनंदन केले आहे.
———————————————-
कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही — बाळासाहेब पटारे
———————————————-
कारखानदार बाहेरून खरेदी करण्यात येणाऱ्या उसाला आपापसात ठरवून कमी दर देतात. उसाची झोनबंदी संपुष्टात आली तरी शेतकऱ्यांऐवजी कारखानेच फायदा उठवताना दिसतात. फुकटात ऊस मिळवण्याची चटक लागलेल्या कारखान्यांना या आदेशामुळे मोठी चपराक बसणार आहे. यापुढे शेतकऱ्यांनी कारखान्यांकडून लेखी भाव ठरल्याशिवाय उस पुरवठा करू नये. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे सिद्ध करणारा आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता आला.