कार्तिकी वारी नियोजन बैठक संपन्न.
दरवर्षी प्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत आळंदी शहरात पार पडणार असून वारीच्या पूर्व तयारी ची नियोजन बैठक उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृह येथे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी पार पडली.
बैठकीच्या सुरुवातीला आळंदी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित ग्रामस्थांना आपल्या सूचना मांडण्यास सांगितले. डी डी भोसले पाटील यांनी भक्ती सोपान पुलाचे कठडे बसविणे,फिरते शौचालय संख्या वाढविणे, पोलिसांकडून वारी काळात ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद कर्मचाऱ्यांची होणारी अडवणूक, वारी काळात अखंडित वीजपुरवठा, विधानसभा निकाल दिवशी वारीचा पहिला दिवस असल्याने विजय मिरवणुका यांच्या वर निर्बंध घालने, सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत स्काय वॉक कामाची आवश्यक दुरुस्ती इत्यादी सूचना केल्या. यानंतर सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांची वारीच्या अनुषंगाने झालेली तयारी व पुढील काळातील नियोजन यांची माहिती दिली.
मंदिर समितीचे विश्वस्त ऍड उमाप यांनी निवडणुकांमुळे वारी कडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणाना निवडणुका व वारी दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर परिणाम होणार नाही अश्या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या तसेच वारी पूर्वी सर्व विभागांच्या झालेल्या प्रगती बाबत पुनश्च आढावा घेतला जाईल असे सांगितले.
सदर बैठक आळंदी नगरपरिषद सभागृहात संप्पन झाली व या बैठकीस उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे,मंदिर समिती विश्वस्त उमाप,देखणे, डी डी भोसले पाटील,प्रशांत कुऱ्हाडे,सचिन गिलबिले,राजाभाऊ चोपदार, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह एमएसबी, सार्वजनिक बांधकाम विभाग,पी एम टी, पाटबंधारे विभाग,अग्निशमन दल मोशी,वैद्यकिय अधीक्षक,वाहतूक पोलीस,पंचायत समिती विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.