ब्रेकिंग
*पेंटर आले धावून, पत्रकार क्षीरसागरांचा वाचला जीव..!*
*पेंटर आले धावून, पत्रकार क्षीरसागरांचा वाचला जीव..!*
महाराष्ट्र धर्म माणुसकीला जागणारा आहे. किती ही संकटे येऊदे, मराठी माणूस मदतीला धावून जाणारच, म्हणून तर इथली माती आणि माणसे आपली वाटतात. अनेकदा त्याचा प्रत्यय येतो. वाळवंटात अचानक एखादा नितळ पाण्याचा झरा दिसावा तसा मराठी माणूस एखाद्या संकटात “श्री दत्त” म्हणून उभा राहतो. या अर्थाने प्राचार्य शिवाजीराव भोसले माणसातले देवपण सजग राहावे, असे प्रतिपादन केले आहे. त्या अंधार रात्री ही तेच घडले. आमचे पत्रकार मित्र, इरा पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष गणेश क्षीरसागर भेंड ता. गेवराई जि.बीड ( मराठवाडा ) येथील शेतीतून फेरफटका मारून दुचाकीवरून गेवराई कडे येत होते. तो रस्ता विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरचा होता. त्यांची दुचाकी याच रस्त्यावरून येत असताना रानमळा फाट्यावर त्यांच्या दुचाकीला कुणीतरी अज्ञात वाहन चालकाने जोराची धडक दिली. अचानक मोठा आवाज झाला. काही कळायच्या आता गणेशराव सडकेवर जोरात आपटले. अज्ञात वाहन निघून गेले.
तेवढ्यात एक ट्रक ही पाठीमागून आला होता. मात्र, त्या ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक वळवला आणि भरकन निघून गेला. गणेशराव गंभीर जखमी होऊन, एकटेच बेशुद्ध अवस्थेत पडून होते. ती 3 जूलै 2022 ची अंधार रात्र होती. रात्रीचे आठ वाजले असतील. सुदैवाने बाजूलाच एक पेट्रोल पंप सुरू होता. अपघाताच्या आवाजाने डुलकी लागलेले राजू (भाऊ) पेंटर ,कानगुडे ताडकन जागी झाले. कुणाचा तरी अपघात झाला आहे. ते लगबगीने रस्त्यावर आले. दुचाकीवरून कुणीतरी पडलेले त्यांना दिसले. त्या दिशेने ते पळाले. डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तबंबाळ झालेला तो चेहरा ओळखीचा वाटला. अरे..! हे तर सर आहेत. पेट्रोल पंपावरचे मालक, कर्मचारी आणि पेंटर यांनी मिळून क्षीरसागर यांना उचलून पंपावर नेले. त्यांना धीर दिला. रक्त लागलेला चेहरा पुसून घेतला. तुम्हाला तातडीने दवाखान्यात दाखल करतो. घाबरू नका.
गाडीवर प्रेस लिहिले होते. त्यामुळे, पंप मालकाने जिल्हा परिषदेचे शिक्षक, पतसंस्थेचे संचालक श्री लोणकर यांना फोन लावला. नाव सांगताच क्षीरसागर आपले मित्रच आहेत. त्यांना सहकार्य करण्याची सूचना करून लोणकर यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर यांना फोन लावला. घटनेची माहिती दिली.
तौर यांनी घाईने, स्वतःची गाडी भरधाव वेगाने विशाखापट्टणम महामार्गाच्या दिशेने नेली. सोबत पत्रकार भागवत जाधव, प्रसाद कुलकर्णी, सौ. प्रा. क्षीरसागर, शिक्षक पवार सर, होते. जाता जाता त्यांनी मला ही फोन केला. मात्र, मी मुख्यालयी नव्हतो. दुसर्या दिवशी गणेश क्षीरसागर यांची भेट घेऊन विचारपूस केली. बीड, औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाले. चिमुकल्या मुलांच्या आशीर्वादाने मी मोठ्या अपघातातून बचावलो. त्यांनीच तसे कृतज्ञतापूर्वक सांगितले. तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते.
राजू पेंटर च्या रूपात “देव” धावून आला. म्हणून गणेशराव वाचलेत. त्यांना वेळेत उपचार मिळाले. 16 जूलै रोजी सकाळी जुन्या बसस्थानकावर पेंटर ची भेट झाली. त्यांना मनापासून हात जोडले. सर्व पत्रकारांच्या वतीने त्याचे आभार ही मानले. त्यांचे कौतुक केले. पेंटर म्हणाले, मी पंपावर कामाच्या निमित्ताने गेलो होतो. वेळ होता म्हणून जरा पडलो होतो. धाडकन आवाज आला. अचानक गेलो म्हणून बर झाल. माझी पत्नी त्यांच्या शाळेवर नोकरी करत होती. आमच कधी बोलण झाले नाही पण मी त्यांना ओळखत होतो. त्यांना मी ओळख सांगितली मात्र ते भयभीत झाले होते. त्यांना काहीच सुचत नव्हते. थोड्या वेळाने त्यांना शुद्ध आली. आम्ही सगळ्यांनी त्यांना धीर दिला. माणूस म्हणून आपले कर्तृत्व होते. ते पार पाडले. मी फार मोठे काम केले असे काही नाही. पेंटर यांनी गणेश यांची ख्यालीखुशाली विचारली. विशेष बाब म्हणजे, आम्ही दोघे ही बालपणाचे मित्र आहोत.
नको ते पोलीसी झंजट म्हणून अनेक लोक अपघात होऊन रस्त्यावर पडलेल्या लोकांना मदत करायचे टाळतात. परंतू, न्यायालयाने या संदर्भात आदेश देऊन मदत करणारांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे, लोक ही पुढे यायला लागलेत. अशा प्रसंगात एकमेकांना मदतीचा हात दिलाच पाहिजे. तोच आपला माणुसकीचा शाश्वत धर्म आहे. अपघातात गंभीर जखमी अवस्थेत एकटेच पडलेल्या पत्रकार क्षीरसागरांना पेंटर यांनी मोलाची मदत केली. माणुसकीचा धर्म पेंटर यांनी जोपासला आणि वाढविला आहे. असे असंख्य राजू पेंटर जागोजागी उभे राहून अपघातात सापडलेल्यांना मदत करत राहतील. हीच खरी बांधिलकी आहे. सॅल्युट….पेंटर…!
*गणेश भाऊ ढाकणे*
( *पत्रकार रूद्रा न्यूज *)