दादा म्हणजे मराठी लोकरंगभूमीला पडलेले एक सुरेल स्वप्न …
२६ नोव्हेंबर लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा स्मृतिदिन …
दादा म्हणजे मराठी लोकरंगभूमीला पडलेले एक सुरेल स्वप्न …
ज्या ज्या लोकांनी माझ्यावर पुत्रवत माया केली अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे आमचे उमप दादा. कधीतरी मुंबईहून नगर, औरंगाबादकडे जाताना दादांचा अचानक फोन यायचा …अमुक दिवशी इकडे जातोय तुम्ही आहात का घरी .. आणि दादा संगमनेरला यायचे तास दोन तास गप्पा व्हायच्या आणि दादा पुढच्या कार्यक्रमाला जायचे. केवळ तुमची आठवण आली म्हणून मला संगमनेरला भेटायला येणारे दादा .. दादा आणि संगमनेर हे समीकरण नव्याने जुळवायला मी कारणीभूत ठरलो याचा दादांना विशेष आनंद होता. दादांचे मूळ गाव चिकणी ( ता . संगमनेर ) परंतु दादांचा गावाशी फारसा संपर्क नसायचा. एकदा कवी अनंत फंदी पुरस्काराच्या निमित्ताने दादांना भेटलो आणि आणि आमचे ऋणानुबंध जुळले ते कायमचे. पुढच्या प्रत्येक भेटीत दादा संगमनेर बद्दल हळवे होत गेले. आमच्या अण्णासाहेब काळे यांच्या तमाशाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आणि रघुवीर खेडकर यांचा वाढदिवस असो कि कोणतीही पूर्वसूचना नसताना संगमनेरला येऊन त्यावेळी सुरु असलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात झकास गाणे सादर करणारे दादा असो, संगमनेर सांस्कृतिक इतिहासात दादांच्या जांभूळ आख्यान कार्यक्रमाला झालेली ही पहिली आणि शेवटची प्रचंड गर्दी होती त्यादिवशी प्रचंड खुश असलेले दादा असो … असे असंख्य प्रसंग आज डोळ्यासमोर दिसतात. एकदा दादांनी अण्णासाहेब काळे यांच्या झोळे येथील घरी मुक्काम केला. सकाळी आम्ही दादांशी गप्पा मारीत असताना अचानक देवीची गाणी गाणारी मंडळी तिथे आली, दादांनी त्यांना स्वतःजवळ बसवले आणि स्वतः देवीची गाणी गायला सुरुवात केली … असा काही माहोल जमला कि विचारता सोय नाही.
मुलगा उदेशचे लग्न जमले आणि दादांचा फोन आला… मी पत्रिकेत माझे नाव टाकल्यावर त्यात राहणार चिकणी तालुका संगमनेर असे लिहिणार आहे .. पण तुम्ही गावाकडच्या मंडळींनी लग्नाला आले पाहिजे नाहीतर माझीच मुले मला हसतील.. दादांच्या या वाक्यावर उदेशच्या लग्नासाठी मुंबईला जाणे आलेच. मी, अण्णासाहेब काळे, देविदास गोरे असे तिघे लग्नाला गेलो. तिथे दादांनी खास आमच्यासाठी टॉवेल टोप्या आणल्या होत्या. मुंबईत ही प्रथा नाही पण खास तुमच्यासाठी आणल्या आहेत म्हणून दादांनी स्वतः आम्हाला टॉवेल टोप्या घातल्या. स्टेज वर अनेक मान्यवर जात येत होते पण दादा पूर्णवेळ आमच्या सोबत थांबले होते. दादा आम्हाला स्टेजवर फोटो साठी घेऊन निघाले आणि दादांचा आनंद काय वर्णावा … दादा छानपैकी नाचत स्टेजवर चढत होते … मुलाच्या लग्नात वडील नाचताहेत हे दृश्य मोठे मनोहारी होते.
२६ नोव्हेंबर ला दादा नागपूरला गेले आणि विमानतळावरून त्यांनी मला फोन केला .. मोठ्या उत्साहात दादा नव्याने सुरु होणाऱ्या वाहिनीबद्दल सांगत होते आणि पुढच्या ३ तासांनी बातमी आली कि दादा स्टेजवरच कोसळले आणि ….. काहीवेळाने नंदेश चा फोन आला … दादा तुम्ही पुढे मुंबईला जा आम्ही सकाळी पोहोचतोय… मी, राठी सर, अण्णासाहेब काळे आणि माझा मुलगा अभिजित मुंबईला पोहचलो .. दुपारी दादांचे पार्थिव घेऊन रुग्णवाहिनी आली .. कन्नमवार नगरचा परिसर प्रचंड गर्दीने भरून गेला होता … माझ्याशेजारी तत्कालीन मंत्री छगन भुजबळ आणि रामदास आठवले उभे होते .. गाडी नेमकी आमच्याजवळ थांबली .. दरवाजा उघडला शवपेटी बाहेर काढली आणि कशी काय माहित नाही सर्वप्रथम तिचा एक भाग माझ्या हातात .. दुसरा भुजबळांच्या हातात आणि मागच्या बाजूने इतर दोघांनी हात दिला… दादांचे पार्थिव मुंबईत आणल्यावर त्यांना पहिला खांदा देण्याचे भाग्य मला लाभले….काही क्षणाचा तो काळ पण दादांच्या असंख्य आठवणी मनात कल्लोळ करीत होत्या. जाण्यापूर्वी दादांना काहीतरी चाहूल लागली होती कि काय कल्पना नाही पण दादा असेच अचानक संगमनेरला आले .. पुस्तकांचा एक गठ्ठा माझ्या हातात दिला आणि सांगितले, मी आयुष्यभर जे लिहिले आहे ती सगळी पुसतके आणि माझ्या गाण्यांच्या या सीडी आहेत … हे सगळ तुमच्याकडे सुपूर्द करतोय .. तुम्ही हे व्यवस्थित सांभाळाल याची खात्री आहे असे म्हणून आपली सर्व पुसतके स्वतःच्या सह्या करून माझ्याकडे विश्वासाने सुपूर्द करणारे दादा… संगमनेरला गाण्यांचा कार्यक्रम असताना बाहेर लोक कार्यक्रम सुरु करा म्हणून आरडओरड करीत होते आणि इकडे स्टेजवर दादा माझा मुलगा अभिजित याला कीबोर्ड हळुवारपणे कसा वाजवावा हे शिकवीत होते… कुणीतरी दादांना सांगितले लोक कार्यक्रम सुरु करा म्हणून आरडाओरड करीत आहेत .. त्यावर मी माझ्या नातवाला कीबोर्ड शिकवतो आहे थोडं थांबा हे सांगणारे दादा …. आणि प्रत्येक भेटीनंतर परत जाताना खिशात हात घालून हातात आलेले पैसे न मोजता हे माझ्या नातवांना खाऊसाठी म्हणणारे दादा …. प्रत्येक वेळी कुठेही भेटले कि घट्ट मिठी मारून माझा मुका घेणारे दादा … आज दादा आपल्यात नाहीत पण त्यांच्या निर्व्याज प्रेमाच्या अनेक आठवणी मनात रुंजी घालताहेत… दादांच्या स्मृतीला वंदन …