मधुशेठ नेराळे गेले… तमाशाचे एक पर्व संपले … लेखन-संतोष खेडलेकर

मधुशेठ नेराळे गेले… तमाशाचे एक पर्व संपले …
लेखन-संतोष खेडलेकर
“हे बघ संतोष; तू आता फार काही नाटकं करायची नाहीस… माझ्याबरोबर मुंबईला यायचं…”
मधुशेठ नेराळे उर्फ दादांनी आपल्या मिश्कील शैलीत फर्मान सोडलं. त्यांना नाही म्हणणे शक्यच नव्हतं. पुण्यात आमची लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानची मिटिंग आटोपली आणि दादांनी मला रिक्षात बसवलं. आम्ही निमआराम बसने मुंबईकडे निघालो. तिकीट अर्थात दादांनीच काढलं. दरम्यान बसमधूनच दादांनी घरी फोन लाऊन त्यांच्यासोबत मी येत असल्याचं सांगितलं आणि छान जेवणाचा बेत करा असंही सांगितलं. छान बेत म्हणजे काय हे मला लगेच लक्षात आलं नाही… पण पुढच्या एका गोंधळची ती नांदी होती.
गणेशोत्सव जवळ आला होता. लालबागला दादांच्या हनुमान मंगल कार्यालयात सजावटीचे सामान तयार करण्याचे काम सुरु होते. कधीकाळी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या ‘न्यू हनुमान थियेटर’चे त्यांनी १९९४ नंतर मंगल कार्यालयात रुपांतर केले होते. आम्ही मुंबईत पोहचलो. रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. प्रचंड भूक लागली होती. दादा आणि मी जेवायला बसलो आणि समोर दोन ताटं वाढून आली… मी क्षणभर चमकलो… दोन्ही ताटात मटन आणि भाकरी होती. मी दादांना म्हटलं,
“दादा दुपारची एखादी शाकाहरी भाजी असेल ना घरात मला तीच वाढा…”
“का? काय झालं… मटन आवडतं नाही का तुला?”
“दादा, मी कधीच मटन खात नाही…”
“का? खात नाहीस… आवडतं नाही की ब्राह्मण आहेस?”
“दोन्हीही… “ मी उत्तरलो… आणि घरात एकच हशा पिकला. दादा म्हणाले “अरे तू येणार म्हणून मी घरी स्पेशल बेत करायला सांगितला आणि तू माझी फजितीच करून टाकली” त्यानंतर माझ्यासाठी पुन्हा स्वयंपाक रांधायला सुरुवात झाली आणि रात्री बारा साडेबाराला आमची जेवणं आवरली.
पुढे जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा दादा या प्रसंगाची हटकून आठवण काढायचे आणि आमच्यात तिसरा कुणी असेल त्यांनाही माझी ही फजिती सांगायचे.
माझ्या मानस भगिनी, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्यामुळे माझी आणि दादांची ओळख झाली. मी, शाहीर दादा पासलकर, ज्येष्ठ ढोलकीपटू पांडुरंग घोटकर, नगर आकाशवाणीचे तत्कालीन कार्यक्रम अधिकारी लियाकत अली सय्यद नंतरच्या काळात शाहीर सुरेश वैराळकर, स्वागत थोरात, सुप्रसिद्ध लावणी कलावती रेश्मा परितेकर असे आम्ही मधु ताईंनी स्थापन केलेल्या ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य होतो. मधूशेठ नेराळे आमचे मार्गदर्शक. त्यामुळे मिटिंगच्या निमित्ताने आमच्या भेटी व्हायच्या. आमची ही मिटिंग म्हणजे तसं दोन तासाची नसायची. सकाळी साडेदहा आकारापासून आम्ही सगळेजण जमायचो. मस्त गप्पांचा फड रंगायचा. दुपारी मधुताई आणि त्यांच्या सुनबाई शीतलने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद घ्यायचो. अडीच तीनला आमची मिटिंग सुरु व्हायची आणि संध्याकाळी उशिरा संपायची. आमची प्रत्येक मिटिंग म्हणजे आनंदसोहळा असायचा.
एकदा मधूशेठ नेराळे, लावणी सम्राज्ञी गुलाबमावशी संगमनेरकर, वर्षाताई संगमनेरकर, रवी संगमनेकर, कल्पना संगमनेरकर, पराग चौधरी, किशोर मोरे दुपारीच संगमनेरला माझ्या घरी आले. त्या दिवशी मी आमच्या संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने कांताबाई सातारकर आणि गुलाबमावशीचा संगमनेरकरांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार डॉ. सुधीरजी तांबे, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, शिवचरित्रकार एस.झेड. देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या सत्कार सोहळ्यानंतर गुलाबमावशी, कांताबाई सातारकर आणि सुशीलामावशी सातारकर यांची नृत्याची आणि गाण्याची अशी काही जुगलबंदी रंगली की बस… वर्षाताई संगमनेरही नंतर यांच्यात सामील झाली. या कार्यक्रमानंतर नेराळेदादांनी पाठीवर शाबासकीची थाप मारून, “आजचा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी बघितला ते सगळे भाग्यवान… या भाग्यवंतात तुझ्यामुळे माझाही समावेश झाला” अशी शाबासकी दिली.
नेराळे दादांकडे अनेक तमाशा अभ्यासक विद्यार्थी जायचे, माहिती विचारायचे. अशा अनेक विद्यार्थ्यांना दादा थेट संगमनेरला माझ्याकडे पाठवायचे… हा त्यांचा माझ्यावरचा विश्वास होता. तमाशावर आधारित काही पुस्तकात संबंधित लेखकांनी माझा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता. ही गोष्ट मला माहित नव्हती. दादांनीच एकदा मुंबई भेटीत ही गोष्ट सांगितली आणि कौतुकही केलं.
सात आठ वर्षांपूर्वी तमाशा कलाकारांवर लेखमाला लिहिण्यासाठी प्रा. डॉ. श्यामल गरुड यांनी मला फोन केला. नंतर तेव्हा त्यांना मी एक वाक्य सांगितले, “मला जर कुणी सांगितले की तमाशा क्षेत्रात तुम्हाला अतिशय नम्रपणे हात जोडून कुणापुढे बसायला आवडेल किंवा तुम्ही या क्षेत्रात कुणाला अधिकारी व्यक्ती मानता? तर मी क्षणाचाही विलंब न लावता एक नाव घेईन ते म्हणजे मधूशेठ नेराळे…” हीच भावना माझ्या मनात कायम राहिली. कारण दादांकडून मी खूप वेगळ्या अंगाने तमाशा ऐकला, समजून घेतला. त्यांनी मला एकदा प्रश्न केला, “महाराष्ट्रात व्यावसायिक अंगाने सहकार केव्हा सुरु झाला?” मी म्हटलं “साखर कारखानदारीच्या रुपात आपल्याकडे सहकाराची सुरुवात झाली” दादा हसले आणि म्हणाले, “अरे आपल्या तमासगिरांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम सहकाराची मुहूर्तमेढ रोवली…” मला आश्चर्य वाटलं… म्हटलं, “कसं काय ?” दादा म्हणाले, अरे तमाशाच्या सुरुवातीला फडमालक ही संकल्पनाच नव्हती. ज्याच्याकडे ढोलकी आहे तो ढोलकी घेऊन यायचा, कुणी टाळ आणायचा, कुणी तुणतुण आणायचा… तमाशा सादर झाला की सगळेजण मिळालेली बिदागी वाटून घ्यायचे… तेव्हा कुणाला पगार नसायचा किंवा कार्यक्रमानुसार निश्चित बिदागी नसायची…” दादांच्या विचार करण्याच्या या पद्धतीने मी खूपच प्रभावित झालो.
त्यांच्या वडलांनी, पांडुरंग नेराळे यांनी तमाशा थियेटर कसे काढले याची गोष्टही ते खूप रंजकपणे सांगायचे. त्यावेळी परळ – लालबागला दूरवरच्या कुर्ला, बांद्रा किंवा मुलुंड अशा गावातली शेतकरी मंडळी आपला शेतमाल विकायला यायची. या भागात मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या असल्याने कामगार वस्ती होती. संध्याकाळपर्यंत शेतमालाची विक्री झाल्यावर अनेक शेतकरी आपल्या बैलगाड्या तिथेच लाऊन झोपायचे. या लोकांसाठी आणि कामगार वर्गासाठी तमाशा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा. पांडुरंगशेठ नेराळे यांनी तिकीट लाऊन तमाशाचे कार्यक्रम आणायला सुरुवात केली. यातूनच पुढे काही वर्षांनी न्यू हनुमान थियेटरची निर्मिती झाली.
जेव्हा दादू इंदुरीकर यांच्या तमाशाचा तंबू जाळण्यात आला. ते कफल्लक झाले तेव्हा मधूशेठ नेराळे यांनी पुढाकार घेतला आणि जसराज थियेटरच्या माध्यमातून ‘गाढवाचं लग्न’ हे लोकनाट्य राज्यातल्या वेगवगेळ्या थियेटरमध्ये सादर करायला सुरुवात केली. दादोबांचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म केला तो नेराळे दादांनीच. दादा लोककला क्षेत्रात केवा आयोजक किंवा थियेटर मालकाच्या भूमिकेत कधीच वावरले नाहीत. ते शास्त्रीय संगीत शिकले होते. त्यांचा शाहिरी, नाटक, तमाशा आदींचा उत्तम अभ्यास होता. लोक कलाकारांविषयी त्यांच्या मनात नेहमीच ममत्वाचा भाव राहिला. दादासाहेब रुपवते हे अध्यक्ष आणि वसंत बापट उपाध्यक्ष असलेल्या ‘मराठी लोककला मंच’च्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. कलाकारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर पदरमोड करून काम केलं. अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषद, तमाशा परिषद अशा अनेक संस्थांसाठी त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात खूप काम केलं.
नेराळे दादांच्या खूप आठवणी आहेत… त्यांचे लोककलेवरचे निस्सीम प्रेम, लोककलाकारांना सुखाचे चार घास मिळावे म्हणून त्यांनी केलेली धडपड… त्यांचे माझ्यावरचे प्रेम या सगळ्या आठवणी आज दाटून आल्या आहेत. जुन्या तमाशाबरोबरच समकालीन तमाशाचा चालता बोलता विश्वकोश आज हरपला आहे. शाहिरी, तमाशा क्षेत्राने आज खूप खूप काही गमावले आहे… आणि मी, ज्यांना बघताच नतमस्तक व्हायचो असे माझे तमाशा क्षेत्रातले गुरु गमावले आहेत… दादा भावपूर्ण श्रद्धांजली…