पिण्याच्या पाण्यासाठी मानोरी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
*पिण्याच्या पाण्यासाठी मानोरी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा*
राहुरीत तालुक्यातील बारागाव नांदूर पाणी योजनेतुन मानोरी गावाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करायची वेळ आली आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक हा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे योजनेविराधात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
बारागाव नांदूर पाणी योजनेतील मानोरी हे गाव अंतिम टप्प्यांमध्ये येते, पूर्वी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची टाकी नियमित भरायची.परंतु आता गेल्या चार ते पाच महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहवे लागत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये गावक-यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांसह
ग्रामपंचायत पदाधिका-यांनी ८ जुन रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच ताराबाई वाघ म्हणाल्या की, प्रत्येक गावामध्ये मानोरी प्रमाणे टाकीला मीटर बसविण्यात यावे. गावाच्या टाकीचे बायपास काढण्यात यावे कनेक्शन प्रमाणे आणि लोकसंख्येप्रमाणे गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा. मानोरी गावामध्ये सध्या नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे त्यामुळे तात्काळ तात्काळ या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव म्हणाले की. मानोरी गावांमध्ये गेल्या पाच महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे गावाला दहा ते बारा दिवसात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो योजनेतील मानोरी गाव हे दोन नंबर वर आहे तरी देखील या गावाकडे योजनेकडून दुर्लक्ष होत आहे.योजनेच्या एका कर्मचाऱ्यामुळे मानोरी गावाच्या पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.त्यामुळे सध्या मानोरी ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे येणाऱ्या काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.