स्वच्छतेसाठी मिळालेली बक्षिसाची रक्कम परत करावी*

*अस्वच्छतेमुळे गेवराईकर त्रस्त*
*न.प. ने स्वच्छतेसाठी मिळालेली बक्षिसाची रक्कम परत करावी*
*राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे यांची मागणी*
शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे, ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाली सफाई न झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या दुर्गंधीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. घाण आणि अस्वच्छतेमुळे शहरात रोगराई निर्माण झाली आहे. स्वच्छ गेवराई, सुंदर गेवराई च्या नावाखाली करोडो रुपयांचा चुराडा करून केवळ कागदोपत्री स्वच्छ गेवराई दाखवून शासनाला फसवून मिळवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या बक्षिसाच्या रक्कमा नगर परिषदेने शासनाला परत कराव्यात अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे यांनी केली आहे.
पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे, गुत्तेदारांशी टक्केवारीपूर्ण संबंध ठेवल्यामुळे रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले. नगर परिषद हद्दीतील रस्त्यांवर चिखल आणि हद्दीच्या बाहेर आपल्या शेताजवळील रस्ते मात्र स्वच्छ ? याची गुपीतही टॅक्स भरणाऱ्या नागरीकांना कळले आहे. गुत्तेदारांना पोसणार नाही अशी भिमगर्जना करणाऱ्या तथाकथित सत्ताधाऱ्यांना पैठण ते गेवराई पाणीपुरवठा कामामध्ये स्वतःचे तोंड काळे करताना नागरीकांनी पाहिले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्वच्छ आणि पुरेसे पाणी नागरीकांना मिळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी शहराचे दोन भाग करून स्वच्छतेचे टेंडर बगलबच्चांना दिल्यामुळे कोट्यावधींचा निधी खर्च करूनही शहराची स्वच्छता होत नसल्याचे खरे वास्तव लोकांसमोर आले आहे. नगर परिषदेकडे घंटा गाड्या आणि स्वच्छता कर्मचारी असतानाही त्याच कर्मचाऱ्यांकडून काम करून घेवून खाजगी लोकांच्या नावाने लाखोंची बिले उचलणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील नागरीक त्रस्त असून त्याचा जाब सत्ताधाऱ्यांनी दिला पाहिजे असा सवाल गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे यांनी केला आहे.
सातत्याने विरोधकांना बदनाम करून स्वतः किती साव आहोत हे दाखविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न यानिमित्ताने फोल ठरला आहे. निवडणुकीत भरघोस मते देणाऱ्या गेवराईतील नागरीकांची केवळ पैशासाठी फसवणुक केली जात आहे. स्वच्छ गेवराई, सुंदर गेवराई च्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी मलिदा खाल्ला असून शहराचा अक्षरशः उकीर्डा केला आहे. दाखवायचे दात आणि खायचे सुळे दात लोकांना अस्वच्छतेतून दिसले आहेत, येणाऱ्या काळात गेवराई शहरातील सुज्ञ नागरीक तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत असेही शेवटी दिपक आतकरे यांनी सांगितले आहे. शहरातील नागरीकांच्या भावनांना यानिमित्ताने त्यांनी वाट निर्माण करून दिली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक शाम येवले, बंडूसेठ मोटे, आनंद सुतार, दत्ता दाभाडे, विठ्ठल पवार, सुभाष गुंजाळ, अक्षय पवार, संतोष आंधळे, संदिप मडके, आवेजसेठ, नविद मशायक, जयसिंग माने, रजनी सुतार, सरवर पठाण, दत्ता पिसाळ, बाळासाहेब दाभाडे, संजय पुरणपोळे, कृष्णा गळगुंडे, शांतीलाल पिसाळ, वसीम फारुकी, गुफरान ईनामदार, गोरख शिंदे, कांता नवपुते, धम्मा भोले, खालेद कुरेशी, शेख रहीम, जे.के.बाबुभाई, शुभम टाक, युवराज नागरे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.