शेतकऱ्यांच्या पोरांनो जागे व्हा शिवरायांचे विचार आत्मसात करुन आईबापाच्या कष्टाचं चीज करा
शेतकऱ्यांच्या पोरांनो जागे व्हा शिवरायांचे विचार आत्मसात करुन आईबापाच्या कष्टाचं चीज करा
गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी येथे युवा व्याख्याते शेतकरी पुत्र गणेश फरताडेंचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. शिवजयंती ही वैचारिक दृष्टिकोनसमोर ठेवून शिवरायांचा आदर्श घ्यावा. शेतकऱ्यांनी शिवचरित्राचे वाचन करावे म्हणजे प्रत्येक समस्येवर पर्याय मिळेल. शिवरायांचं चरीत्र हे फक्त ढाल, तलवारी अन् घोड्यांच्या टापा नाहीत तर सर्वसामान्यांना जिवन जगण्यासाठी सगळ्यात मोठा शिवमंत्र आहे. गेली अनेक वर्षांपासून शेतकरी समृद्ध होत नाही. याची कारण शेतकऱ्यांच्या पोरांनी शोधून काढली पाहिजेत. तो गरीबीतून बाहेर कसा येईल याचा विचार करुन शिवरायांनी त्याकाळात वापरलेले नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान याचा अवलंब करुन शेतकऱ्यांच्या पोरांनो परिस्थितीचे भांडवल न करता परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन परिस्थितीवर मात करत शेतकरी बापासाठी जागे व्हा शिवरायांचा विचार आत्मसात करुन परिवर्तन घडवा तसेच आईबापांच्या कष्टाचं चीज करुन त्यांचे स्वप्न साकार करा असे प्रतिपादन युवा व्याख्याते शिवश्री गणेश फरताडे यांनी व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून रॉयल शेतकरी पुत्र तथा रिल्स स्टार गणेश फरताडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.रामनाथ म.सालपे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष पत्रकार विनोद पौळ, विकास म.मुटके यांच्यासह समोर गावातील प्रतिष्ठित नागरीक तसेच महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना गणेश फरताडे म्हणाले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण बोलतो याचा अभिमान आहे. शेतकऱ्यांच्या घरातच खरी संस्कृती पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या पोरांनो जगाच्या पाठीवर कुठे जा परंतु घाबरू नका शेतकरी या जगाचा राजा आहे. लोक कित्येकांची घरं, कुटुंब लुबाडतात परंतु शेतकरी हा कित्येकांचे पोट भरतोय याचा अभिमान असला पाहिजे. पोरांनो मोबाईलचा वापर कमी करा. जीवनात वेळेचे भान जोपासा तसेच सध्या तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले असून यामुळे कित्येकांची घरे बरबाद झालीत म्हणून तरुणांनो व्यसनापासून दूर रहा. शेतकऱ्याची मुल आहात म्हणून लाजरेपणा, बुजरेपणा मनातून काढून टाका.शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड द्या. येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असेल असा मौलिक सल्लाही शेवटी बोलताना दिला. दरम्यान शिवजयंती निमित्त गावात भगवे ध्वज लावून भव्य जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार विनोद पौळ यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार तथा सरपंच भागवत जाधव तर बहारदार सूत्रसंचालन राधाकिसन पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष तसेच पंचक्रोषीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसंघर्ष मित्र मंडळ व बेलगुडवाडी येथील तरुणांनी परिश्रम घेतले.