
टाकळीभान येथे बसस्थानक बांधावे. प्रवाशांची मागणी.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे बसस्थानक नसल्याने श्रीरामपूर नेवासा राज्यमार्ग रस्त्यावर श्रीरामपूरकडे जाणार्या प्रवाशांसाठी व नेवासाकडे जाणार्या प्रवाशांसाठी स्वतंत्र बसस्थानक बांधावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
श्रीरामपूर-नेवासे राज्यमार्गावरील मध्यस्थानी असलेले टाकळीभान गावचे बसस्थानक रस्ता रुंदीकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडले आहे. यामुळे सध्या बसस्थानक नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यांचा त्रास सहन करावा लागत असून पाऊस आला तर प्रवाशांना येथील पोलिस चौकी व हाॅटेल अशोकाच्या शेडचा आश्रय घ्यावा लागत आहे.
बाभळेश्वर ते नेवासे फाटा या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुर असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांबाबत धडक मोहिमेत येथील बसस्थानक पाडले आहे त्यामुळे पूर्ण उन्हाळ्यात विद्यार्थी, प्रवासी यांना बसस्थानक नसल्याने उन्हात ताटकळत उभे राहावे लागले आता पावसाळा सुरू असून पावसाळ्यातही विद्यार्थी व प्रवाशांसाठी निवारा नाही त्यात एसटी महामंडळाकडून बसस्थानक बांधण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यासारखे पावसाळ्यातही प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत.
बसस्थानक नसल्याने विद्यार्थी- विद्यार्थिनी व पालक महिला, प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे.त्यामुळे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी महामंडळाने श्रीरामपूरकडे जाणार्या व नेवासाकडे जाणार्या प्रवाशांसाठी स्वतंत्र बस स्थानकाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.