श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर बु ग्रामपंचायतीस मिळाला स्मार्ट ग्राम पुरस्कार
श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर बु ग्रामपंचायतीस मिळाला स्मार्ट ग्राम पुरस्कार
बेलापुर (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सन २०२१-२२ चा मानाचा आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून बेलापूर बु., ता. श्रीरामपूर ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये (विभागून) व मानचिन्ह असे आहे. स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त गावाची यादी नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केला आहे.
बेलापूर बु., ग्रामपंचायतीस १०० वर्ष पूर्ण झाली असून शतकपूर्ती वर्ष साजरे होत आहे. शतकपूर्ती वर्षात ग्रामपंचायतीस पुरस्कार प्राप्त झाला असुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून गावात चौक सुशोभीकरण, भूमिगत गटारी, जॉगिंग ट्रॅक, नाव घाट सुशोभीकरण, १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे.तसेच दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता याचीच दखल घेत ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्रामपुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारा बद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच ,अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.