राहुरी तालुक्यात शांतता व जातीय सलोख्याची परंपरा – पो.नि. दराडे
सर्वधर्मीयांच्या वतीने टाकळीमिया येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
सर्वधर्मीयांच्या वतीने टाकळीमिया येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
राहुरी तालुक्यात शांतता व जातीय सलोख्याची परंपरा – पो.नि. दराडे
गावपातळीवरील सर्वधर्माच्या नागरीकांनी जातीय सलोखा ठेवून आपआपली धर्म परंपरा जपताना एकमेकांचा आदर केला तर अन्य विघातक शक्तीचा उद्रेक होणार नाही. आपआपसात आदर आणि भाईचारा हीच आपल्या भारतीय संस्कृतीची विचारधारा असून यातूनच आपले राष्ट्र प्रगत होईल असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी केले.तर टाकळीमिया गाव आणि राहुरी तालुक्यात शांतता आणि जातीय सलोख्याची परंपरा असून ती टिकविण्याची जबाबदारी नागरीकांची आहे. येथील सर्वधर्मियांच्या मेळाचा आदर्श इतर गावे आणि नागरीकांनी घ्यावा असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले.
टाकळीमिया येथे नुकतेच सर्वधर्मियांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी पवित्र रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार फसियोद्दीन शेख, पो.नि. प्रताप दराडे बोलत होते. यावेळी श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी टाकळीमियातील जातीय सलोखा आणि परंपरेचे जपवणूक करून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे म्हणाले, टाकळीमियासह जिल्ह्यात आम्ही शेतकरी संघटनेचे काम करत असताना सर्वधर्म समभावाची जोपासना करीत आहोत. टाकळीमिया गाव हे शांतताप्रिय गाव आहे. येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक नागरीकात परस्पर धर्माविषयी आदर असल्याने ही परंपरा टिकून आहे. त्यामुळेच टाकळीमिया गाव हे प्रगतीपथावर आहे.
सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव म्हणाले, जातीय सलोखा ठेवण्यासाठी येथील सर्वधर्मातील नागरीक जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतात. यातून पोलीस व राज्य प्रशासनाला मोठे सहकार्य मिळते. टाकळीमिया गावातील नागरीक आणि नेतृत्वाची विचारधारा प्रगल्भ असल्याने शांतता आणि जातीय सलोख्याला बाधा येत नाही. यापुढेही ही परंपरा टिकविण्यासाठी जबाबदारी आम्ही सर्वधर्मिय नागरीक आनंदाने पार पाडू असे आश्वासन जाधव यांनी दिले.
यावेळी सुभाष करपे, ज्ञानदेव निमसे, फत्तुभाई इनामदार, हमीदभाई पटेल, मधुकर सगळगिळे, नामदेव जगधने, उपसरपंच सुभाष जुंदरे, प्रताप जाधव, सादिक शेख, राहुल चोथे, पत्रकार अक्षय करपे, बाळासाहेब शिंदे, प्रा. सुभाष शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे, निलेश जगधने, महेश गायकवाड, करीमभाई शेख, बादशहाभाई इनामदार, सेक्रेटरी सगळगिळे, सुभाष चोथे, अजिंक्य निमसे, अमीरभाई इनामदार, चंद्रशेखर वाडकर, सतीश कवाणे आदी उपस्थित होते. आभार गुलाबराव नमसे यांनी मानले तर सूत्रसंचलन डॉ. पठाण यांनी केले.