शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी ना. बच्चुभाऊ कडु यांनी घेतलेली भुमिका योग्यच – सुरेशराव लांबे पाटील
शिंदे सरकार स्थापन करण्यासाठी ना. बच्चुभाऊ कडु यांनी घेतलेली भुमिका योग्यच – सुरेशराव लांबे पाटील
राहुरी – दोन दिवसापुर्वी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडीत ना. बच्चुभाऊ कडु यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना दिलेली साथ ही योग्य असल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीतुन मुख्यमंत्री ना.शिंदे व उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांची झालेली निवड ही योग्य असुन सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे. महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अडीच वर्षापासुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात चालु असलेला भ्रष्टाचार, मित्र पक्षाला दुजा भावाची वागणूक, शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या अहिताचे निर्णय या सर्व गोष्टीला कंटाळून आमचे नेते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू, शिवसेना नेते ना एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यांनी उशिरा का होईना समविचारी पक्षाबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी नगर पाथर्डी या मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांचा अनपेक्षित विजय झाला व राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष अल्पमतात असताना शिवसेना व भाजप यांच्या भांडणात महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यात तनपुरे यांना सुदैवाने सत्ताधारी सरकारमध्ये ऊर्जा राज्य मंत्री व इतर मंत्री पदे मिळाली. अडीच वर्ष उलटून गेले तरी मतदार संघातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व इतर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे सोडुन घराण्याची परंपरा सांभाळत विविध प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मतदार संघात कुठलाच विकास केला नाही. जो काही केला तो निकृष्ट दर्जाचा करत टक्केवारी घेऊन मोठ्या प्रमाणात माया जमा केली. तनपुरे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी मतदार संघातील पिण्याच्या प्रादेशिक पाणी योजना बंद करुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणले. शेतक-यांच्या शेतीची चालु विज थकबाकीच्या नावाखाली सतत महावितरण अधिका-यांना पाठबळ देऊन बंद केली. कोन्ही काही बोलला तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन 353 सारखे गुन्हे दाखल करु असा धाक दाखवत मतदार संघातील कष्टकरी शेतकऱ्यांचे ऊस, कांदा, घास जनवारांचे चारा पिके जाळण्याचे पाप केले. मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असताना विज बिल वसुलीसाठी संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला तरी पाण्याचे नियोजन जाणुन बुजुन केले नाही. राहुरी तालुक्यात शेतक-यांना रात्रीचे कांदे लागवड करण्याची दुर्दैवी वेळ आणली. अनेक शेतकऱ्यांना विहीर बोरवेल व धरणात पाणी असूनही पीक करता आली नाही. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या मित्रपक्ष व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनावर दबाव टाकून गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करून लोकशाही मोडीत काढत सत्तेचा गैर वापर केला. मतदार संघातील विकास करण्याऐवजी प्रत्येक गावात व घराघरात भांडणे लावून जिरवाजिरवीचे राजकारण केले. तनपुरे यांना मंत्रीपद म्हणजे माकडाच्या हाती कोलीत होय अशी टीका लांबे यांनी केली. आता योग्य सरकार आल्याने राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न आमचे नेते नामदार बच्चुभाऊ कडू व मित्र पक्षातील नेत्यांमार्फत सोडवले जाईल अशी ग्वाही प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.