शेतीच्या बांधावरून पुतण्यानेच केला चुलत्याचा खून शेतीच्या वादातून वांजोळी येथील घटना
शेतीच्या बांधावरून पुतण्यानेच केला चुलत्याचा खून शेतीच्या वादातून वांजोळी येथील घटना
नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे शेतीच्या वादातून पुतण्यानेच सख्ख्या चुलत्याचा खून केला असल्याची घटना घडली आहे.
मयत व आरोपी यांची वांजोळी येथे गटनंबर ३७१/१ मध्ये शेती असून त्यांचे एकमेकांना लागून बांध आहेत. याच शेतीबांधाच्या कारणावरुन नेहमी वाद सुरू होते. अशातच दि. १६ रोजी भुईमूगाच्या शेतात फिर्यादी दत्तात्रय गवाजी खंडागळे (वय २२ रा. वांजोळी) हे शेतात पाणी भरत असताना त्या ठिकाणी आरोपी पोपट उर्फ पप्पू भिकाजी खंडागळे (वय ३३) हा तेथे आला. फिर्यादीचे वडील मयत गवाजी रामकृष्ण ऊर्फ रामकिसन खंडागळे (वय ५४) यांना तुम्ही माझा बांध का कोरला ? असे म्हणत शिवीगाळ करू लागला. तसेच लोखंडी पाईपने डोक्यावर मागील बाजूस मारुन जखमी करून जिवे ठार मारले.
मयताच्या मुलाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, सोनई ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी करत आरोपीस तातडीने ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे हे करत आहेत.