महिला आरक्षणाचा गैरवापर करून स्वतःची सत्ता गाजवणाऱ्या ‘सरपंच पती’मनमानी कारभाराविरुद्ध…..

महिला आरक्षणाचा गैरवापर करून स्वतःची सत्ता गाजवणाऱ्या ‘सरपंच पती’मनमानी कारभाराविरुद्ध…..
श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत लोकशाहीचा अक्षरशः खून होत असून, महिला आरक्षणाचा गैरवापर करून स्वतःची सत्ता गाजवणाऱ्या ‘सरपंच पती’ प्रवीण फरगडे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गावातील ८ सदस्यांनी आता थेट जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या तक्रारीत सदस्यांनी अत्यंत विदारक सत्य मांडले असून, प्रवीण फरगडे हे कोणत्याही घटनात्मक पदावर नसतानाही पडद्यामागून संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार नियंत्रित करत असल्याचे आणि महिला सरपंचांना केवळ ‘रबरी शिक्का’ म्हणून वापरत असल्याचे उघड झाले आहे. स्वतःच्या राजकीय वर्चस्वासाठी सरपंच महोदयांच्या अधिकारांचा आणि स्वाक्षरीचा हा नंगा नाच म्हणजे संविधानाने दिलेल्या महिला आरक्षणाचा दिवसाढवळ्या अपमान असल्याची चीड आता ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.*
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, गटविकास अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती,व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार पत्रात आठ ग्रामपंचायत सदस्यांनी म्हंटले आहे की,या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतीच्या मासिक सभा किंवा ग्रामसभांच्या वेळी गावात कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नसतानाही, केवळ सदस्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी प्रवीण फरगडे यांच्या हट्टामुळे पोलीस संरक्षणाची मागणी केली जाते. लोकशाहीमध्ये विकासकामांच्या प्रश्नांची कायदेशीर उत्तरे देण्याऐवजी पोलिसांचा धाक दाखवून लोकप्रतिनिधींचे तोंड दाबण्याचा हा अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न असल्याचे सदस्यांनी निवेदनात म्हटले आहे. इतकेच नाही तर, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी असलेल्या ओळखीचा गैरवापर करून माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि प्रामाणिक शासकीय कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण आणण्याचे कामही हे ‘अघोषित राजे’ करत आहेत. ज्यांना साधी निवडणूक लढवण्याची किंवा जनतेसमोर उभे राहण्याची हिंमत नाही, ते आज ‘सुपर सरपंच’ म्हणून मिरवत असून त्यांनी गावच्या प्रतिष्ठेचा लिलाव केला असल्याचे तक्रार पत्रात म्हंटले आहे.
पुढे म्हंटले आहे की,या ‘सरपंच पती’ संस्कृतीच्या सुळसुळाटामुळे भैरवनाथनगरचा विकास पूर्णपणे ठप्प झाला असून १५ व्या वित्त आयोगाचा निधी, नियोजित रस्ते आणि पाणीपुरवठ्यासारखी महत्त्वाची कामे केवळ वैयक्तिक अहंकार आणि वादापायी रखडली आहेत. या गंभीर प्रकरणाची सखोल प्रशासकीय चौकशी करून प्रवीण फरगडे यांचा ग्रामपंचायत कार्यालयातील आणि अधिकृत सभांमधील अनधिकृत वावर तात्काळ थांबवावा, तसेच सरकारी यंत्रणेचा दबाव म्हणून वापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी वसंत देवकर, ज्योती लाहोरे, सीमा शिंदे, रुखमिणी देवकर, राहुल लिहीणार, सौरभ गवारे, अलका वायकर आणि प्रशांत लबडे या आठ सदस्यांनी केली आहे. आता प्रशासन या ‘पपेट’ कारभाराला आणि अघोषित हुकूमशाहीला चाप लावणार की ही लोकशाहीची थट्टा अशीच सुरू राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



