धोकादायक ऊस वाहतूकिस प्रतिबंध करणेबाबत प्रहार चे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन… अन्यथा १४ डिसेंबर रोजी ढोल ताशाच्या गजरात आंदोलनाचा इशारा.

धोकादायक ऊस वाहतूकिस प्रतिबंध करणेबाबत प्रहार चे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन… अन्यथा १४ डिसेंबर रोजी ढोल ताशाच्या गजरात आंदोलनाचा इशारा.
टाकळीभान: धोकादायक ऊस वाहतुकीस प्रतिबंध करावा अन्यथा १४ डिसेंबर रोजी ढोल ताशाच्या गजरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिला आहे. त्यांनी याबाबत श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात नमूद केले आहे की,श्रीरामपूर – नेवासा राज्य मार्गावरून संगमनेर, अगस्ती ,प्रवरा ,गणेश,अशोक व युटेक कारखान्यांना ऊस घेऊन जाणारी शेकडो ट्रक व ट्रॅक्टर वाहनांना पाठीमागील बाजूने रिफ्लेक्टर नसतात,तसेच ट्रॅक्टर चालक खूप मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावून ट्रॅक्टर वाहने चालवत असतात, रिफ्लेक्टर नसताना रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना ऊस वाहतुकीचा अंदाज येत नाही, परिणामी अपघात होतात. तसेच ट्रॅक्टर वरील मोठ्या आवाजात सुरू असणाऱ्या गाण्यांमुळे ट्रॅक्टर चालका ला पाठीमागील वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही ओव्हरटेक करताना अपघात होतात व निष्पाप निरापराध नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता आहे.
तसेच वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची इन्शुरन्स, पीयूसी, तसेच फिटनेस संपलेले असतात. कागदपत्रे पूर्ण नसलेली धोकादायक कालबाह्य झालेली ट्रक व ट्रॅक्टर वाहने उसाच्या वाहतुकीला वापरली जात आहे. चालक अल्पवयीन असतात, तर काही चालक दारू पिऊन बेधडकपणे वाहने चालवत असतात याची तपासणी आपल्या कार्यालय मार्फत होत नाही.
तसेच अनेक कारखान्याची उसाची छोटी छोटी भरलेली टिपरे ट्रक व ट्रॅक्टर मध्ये ढीग लावून भरलेली असतात. वास्तविक उसाची टिपरे ताडपत्री किंवा बारदाने यांनी झाकलेली असणे आवश्यक आहे परंतु या ट्रक व ट्रॅक्टर मध्ये टिपरी उघडी असल्याने चालू वाहतुकीतून ही टिपरे दुचाकी स्वाराच्या अंगावर पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत. तसेच चार चाकी वाहनावर टिपरे पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आपल्या श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यातील अनेक अधिकारी श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर पेट्रोलिंग करत असतात त्यांच्या डोळ्या देखत ही धोकादायक उस वाहतुकीची वाहने जात असतात मात्र सदर अधिकारी पद्धतशीरपणे या वाहनांकडे कान डोळा करतात. मात्र सदर अधिकारी इतर वाहनांना व वाहन चालकांना किरकोळ कारणासाठी वाहन अडून कायदेशीर दंड करत असतात मग अधिकारी उसाच्या वाहनावर कारवाई का करत नाही हाही प्रश्न आहे.
तरी आपण या निवेदनाद्वारे विनंती करतो की श्रीरामपूर – नेवासा राज्य मार्गावर जाणाऱ्या धोकादायक ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर यांना लीफ्लेक्टर बसवण्यात यावेत तसेच वाहनावरील टेप रेकॉर्डर चालू वाहन असताना बंद करणेबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व धोकादायक जीवघेण्या ऊस वाहतुकीस प्रतिबंध व्हावा, अन्यथा १४ डिसेंबर 2022 रोजी सकाळी ११. वा. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांचे नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल व नंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी आपल्या कार्यालयाची व प्रशासनाची असेल. याची नोंद घ्यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब ढुस, लक्ष्मण खडके ,नानासाहेब तागड, रमेश भालके, दीपक पटारे, सुजित गोंडे ,विलास पटारे, बाळासाहेब रणनवरे, अतिश नाटकर, दत्तात्रय हळनोर, मोहन मोरे,संतोष रणनवरे आदींच्या सह्या आहेत.