टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच

टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच असून काल रात्री बिबट्याने दोन वेगळ्या भागात दोन कुत्र्यांवर हल्ला केल्याने दोन्ही कुत्रे जबर जखमी झाले आहे. बिबट्याने कुत्र्यावर केलेल्या हल्यामुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. टाकळीभान येथील वाडगाव रस्त्यालगत रहात असलेल्या आप्पासाहेब हरीभाऊ कोकणे यांचे वस्तीत रात्री ३ वाजेच्या दरम्यान बिबट्याने प्रवेश करून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने कुत्रा जबर जखमी झाला असून येथील पेट्रोल पंपा जवळ असलेल्या खोकर रस्ता परिसरात रहात असलेले भगवान परदेशी यांच्या वस्तीत रात्री १२ च्या दरम्यान बिबट्याने प्रवेश करून परदेशी यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने कुत्रा जबर जखमी झाला आहे.
आप्पासाहेब कोकणे यांच्या वस्तीत बिबट्याने प्रवेश करून घरासमोर साखळीने बांधलेल्या कुत्र्यावर
हल्ला केला यावेळी कुत्रा ओरडल्याने कोकणे कुटुंब जागे झाले व त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसून आले व बिबट्या कुत्र्याला ओढीत नेत असल्याचे दिसल्यावर कोकणे यांनी आरडा ओरड केला त्यामुळे बिबट्या पसार झाला मात्र बिबट्याच्या हल्यात कुत्रा जबर जखमी झाला आहे.
भगवान परदेशी यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याने कुत्र्याच्या ओरडण्याच्या आवाजाने परदेशी जागे झाले व त्यांनी बाहेर पाहिले असता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसून आले त्यामुळे परदेशी कुटुंबांनी आरडा ओरड केल्यावर बिबट्या पसार झाला मात्र बिबट्याच्या हल्यात कुत्रा
जखमी झाला आहे.
भोकर सब स्टेशन अंतर्गत कमालपूर फिडरमधून रात्रीचे भारनियमन सुरू आहे त्यामुळे वाडगाव रस्ता परिसरात रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे अंधारात बिबट्या बिनधास्तपणे फिरत असून शिकार करीत आहे. रात्री वीज असती तर विजेच्या दिव्यांमुळे बिबट्या वस्तीत आला नसता असे आप्पासाहेब कोकणे यांनी सांगितले. या परिसरातील रात्रीचे भारनियमन बंद करावे अशी मागणी या परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
आतापर्यंत टाकळीभान परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याने शेतकर्यांच्या पशूधनावर हल्ला करून अनेक शेळ्या, बोकड, कालवड, कुत्रे बिबट्याने फस्त केलेले असल्याने वस्तीवरील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.