आदिवासी मूळचा मालक असूनही भूमीहीन — रघुनाथदादा पाटील

आदिवासींच्या न्याय हक्काच्या लढ्याला शेतकरी संघटनेची साथ राहील
———————————————-
आदिवासी मूळचा मालक असूनही भूमीहीन — रघुनाथदादा पाटील
———————————————-
नेवासा येथे आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळावा संपन्न
———————————————-
नेवासा:- जल,जमीन व जंगल सांभाळणारा आदिवासी भिल्ल समाज हा खरा मालक असूनही आज तो भूमीहिन झाला असून, उदरनिर्वाहासाठी सातत्याने स्थलांतरित होत आहे. भिल्ल समाज शेतकऱ्यांचाच सख्खा भाऊ आहे या भावनेने त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना बांधील असून, त्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहे असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी नेवासा येथे संपन्न झालेल्या आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळाव्याप्रसंगी केले.
आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिगेड यांच्यावतीने नेवासा येथील मोहनीराज संस्थान सभागृहात नुकताच आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित आदिवासी बांधव व महिलांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. बन्सी सातपुते हे होते.
आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात श्री पाटील पुढे म्हणाले की, सरकारी पड जमिनीवर अतिक्रमण करून अनेक वर्षापासून शेती कसविणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा सातबारा झालाच पाहिजे. अनेक भूमिहीन आदिवासी बांधव आपले कुटुंब पोसण्यासाठी नदी,बंधारे व तलावांवर मच्छीमारी व्यवसाय करीत आहेत. परंतु सरकारच्या ठेकेदारी पद्धतीमुळे आदिवासी समाजाच्या हक्काच्या या व्यवसायावरही गदा आली आहे. सरकारने स्वतंत्र फॉरेस्ट खाते निर्माण केल्यापासून जंगलातील साधनसामग्रीची प्रचंड लूट व भ्रष्टाचार झाला आहे. मात्र जंगल राखणारा व त्यावर उपजीविका करणारा आदिवासी जंगलातून हद्दपार झाला. राष्ट्रीय साधन संपत्तीवर पहिला अधिकार आदिवासी बांधवांचा असताना त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. जल, जमीन व जंगलावर आदिवासींचे हक्क पुनर्प्रस्थापित करण्यासाठी या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याची गरज आहे. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सरकारच्या विविध योजना गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचत नाही, राजकीय पुढारी मधल्या मध्येच मलिदा खात आहेत. ही पिळवणूक थांबण्यासाठी प्रबोधन व शिक्षण आवश्यक असून, समाजात जागृती आणण्यासाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे श्री. ज्ञानेश्वर भंगड यांचे काम उल्लेखनीय आहे. समाजात जागृती आल्याशिवाय न्याय हक्काचा लढा उभा राहत नाही. शोषणवादी व लुटीच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्ध संघर्षशील लढ्याची गरज असून, आदिवासी बांधवांच्या न्याय हक्काच्या लढ्याला यापुढील काळात शेतकरी संघटनेची साथ राहील असे स्पष्ट प्रतिपादन श्री रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे नेते व राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड, विठ्ठल माळी, देविदास पवार, नारायण बर्डे, संजय पवार, त्रिंबक भदगले आदींची भाषणे झाली. ॲड. बन्सी सातपुते यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन आदिवासी एकता परिषदेचे नेते कैलासदादा माळी यांनी केले.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा ऊस उत्पादक प्रमुख जगन्नाथ कोरडे, प्रसिद्धीप्रमुख पंकज माळी, जिल्हा संघटक भास्करराव तुवर, शेतकरी संघटनेचे राहुरी ता.अध्यक्ष नारायण टेकाळे, मनोज हेलवडे, सुनील मोरे, अशोक जाधव, परसराम माळी, लताबाई माळी, विमलबाई सोनवणे, चंद्रकला वाघ, मंदाबाई काळे, दत्तू पवार, चंद्रकांत पवार, विलास बर्डे, श्याम मोरे, जयराम पवार, दगडू बर्डे, बाळासाहेब माळी, अशोक मोरे,सोमनाथ बर्डे, बाळासाहेब शिंदे, आदिवासी शेतमजूर संघाचे बाळासाहेब बर्डे, विलास मोरे,सुभाष बर्डे, दिलीप शिंदे,शिवाजी बर्डे, रामू मोरे आदी आदिवासी बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————-
नेवासा तालुक्यातील नागझरी येथे आदिवासी शेतकरी व शेतमजूर संघाच्या नाम फलकाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
———————————————-