शनिशिंगणापुरात दोन गटात राडा; पोलिसांकडून गोळीबार

*शनिशिंगणापुरात दोन गटात राडा; पोलिसांकडून गोळीबार
शनिशिंगणापुरात पोलीस ठाण्यासमोर दोन गटात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून काठी, गज, दगड व गावठी पिस्तूलाचा वापर करीत राडा झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक व पथकाने हवेत गोळीबार करून दिसेल त्यास चोप दिला. या घटनेत दोन गटातील तीन जण जखमी झाले तर पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व पोलीस कर्मचारी अजय ठुबे जखमी झाले आहेत.
रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या समोर काही अंतरावर एका पुजासाहित्य विक्रेत्यास दुसऱ्या विक्रेत्याकडून दुचाकीचा कट बसला होता. यानंतर दोन्ही युवकांचे समर्थक जमा झाले आणि हातात काठ्या, तलवार, लोंखडी गज घेऊन एकमेकांवर धावून गेले. आरडाओरड, शिवीगाळ व दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येताच शनिभक्तांची धावपळ उडाली. जवळची दुकाने काही क्षणात बंद करुन पळापळ सुरु झाली.
पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व पथकाने हस्तक्षेप करून सर्वांना पांगविण्याचा प्रयत्न सुरु करताच एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. या घटनेनंतर टेंभेकर यांनी हवेत गोळीबार केला व दहा ते पंधरा मिनिटात परिस्थिती शांत झाली. या घटनेत कुसळकर नावाचा एक युवक गंभीर जखमी झाला.