*महाराष्ट्र” आणखी एका बंडाच्या दिशेने*….?

*महाराष्ट्र” आणखी एका बंडाच्या दिशेने*….?
महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नव्या चमत्कारिक घटना घडताना दिसत आहेत. सगळा सत्तेचा आणि लाल दिव्याचा खेळ आहे. महत्त्वाचे मुद्दे बाजुला गेलेत. त्याजागी कुरघोडीचे तंत्र-मंत्र वापरले जात आहे. हे खर म्हणजे मराठी माणसाचे दुर्दैव आहे. राजकारणातले “चित्र” आणि नाटकातली “पात्र”, अधूनमधून बदलत असतात. अगदी तसाच बदल राज्यात झाला आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना, शिवसेनेच्या आमदार ,मंत्र्यांनी बंड केले…! त्यानंतर, ठरल्या प्रमाणे भाजपाच्या मदतीने आलेले शिंदेशाही सरकार…! आता पून्हा बंडात “बंड” होण्याची चिन्हे आणि भाजपात होणारी पंकजा मुंडे यांची घुसमट..! अशा घटनांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असून, सामान्य माणसाला या राजकीय घडामोडीने वीट आणला आहे. रोजच्या जीवनात अत्यावश्यक असलेल्या गोष्टी महाग झाल्यात, काही ठिकाणी पुराचा फटका बसलाय. त्याने सामान्य माणूस मेटाकुटीस आलाय. पण, सत्ताधाऱ्यांना त्याचे काय देणे घेणे दिसत नाही.
शिंदेशाही सरकारचे अजून नीट बुड ही टेकलेले नाही. मंत्रिमंडळ विस्तार महिनाभरा नंतर झाला. तो पर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ,असे दोघेच कार्यरत होते. आता कुठे 18 आमदारांनी शपथ घेतली आहे. हा सोहळा पार पडला. मात्र, दुसर्याच दिवशी नाराजी “लोक नाट्याचा” अंक पहायला मिळाला. नव्या सरकारची दमछाक होत असतानाच, भाजप मध्ये ही सगळे काही आलबेल नाही. याची झलक पंकजाताईंच्या माध्यमातून पहायला मिळाल्याने आणखी काय काय होणार आहे ? याची उत्सुकता लागून राहीली आहे. बंडात “बंड” आणि भाजपात ही बंड शिजले तर मग पून्हा नवी समीकरणे दिसतील का ? हा कळीचा प्रश्न चर्चेत आला आहे.
भाजपाच्या फायर ब्रॅण्ड नेत्या, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा मुंडे यांना होती. त्याशिवाय, त्यांचे चाहते ही आस लावून बसलेच होते. परंतू , तसे काही झाले नाही. दोन तीन दिवस शांत बसल्यावर, रक्षाबंधनाचे निमित्त साधून त्यांनी हलकसा का होईना सिक्सर हाणलाच. एका अर्थाने त्यांनी नाराजी व्यक्त करून आपल्या भावनांना वाट करून दिल्याची चर्चा आहे.
गुरूवार ता. 11 रोजी माध्यमांशी बोलताना पंकजाताई म्हणाल्या की, मंत्रीपदा साठी माझी पात्रता नसेल. म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिले नसावे. माझी पात्रता झाली असं त्यांना वाटेल, तेव्हा ते देतील. मला काही आक्षेप नाही. मीडियातून आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा तर होतच असतात. आता माझे कार्यकर्ते शांत बसलेत . मी पण शांत बसले आहे. आणि मला वाटतं, त्यांना जेव्हा वाटेल की , ज्याची पात्रता आहे. त्यांना तेव्हा ते देतील. माझा काही रोल असण्याचं कारण नाही. मी जे काम करते ते स्वाभिमानाने आणि इज्जतीने. जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा माझा प्रयत्न कायमच राहील. त्या पुढे जाऊन त्यांनी ना. राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशा संदर्भात अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडे बोट दाखवून अधिकचे भाष्य टाळले आहे.
पात्रता असून पदरी उपेक्षा पडत असेल तर किती सहन करायचे आणि का सहन करायचे ? असा सवाल ताईंच्या समर्थकांना पडलाच आहे. पंकजा मुंडे यांच्या ही मनात हा सवाल घोळत असणार आहे. खर तर, पंकजाताई मुंडे यांची पक्षात होणारी घुसमट ही आजची नाही. गेली अडीच वर्ष झाली त्या सगळे सहन करत आल्यात. सगळे दिसते आहे. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष भाजपाचे सरकार होते. त्या काळात त्या मंत्री होत्या. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मुंडे ताई यांचे फारसे जमलेच नाही. आधी असलेला सुसंवाद अचानक बिनसला. त्या काळात टोमणे, चिमटे सुरूच होते. मी, जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. काय झाल एक महिला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पहात असेल तर, एवढे काय आभाळ कोसळले ? अशी आव्हानाची भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे, भाजपातल्या या दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू झालेला विसंवाद अजून ही संपलेला दिसत नाही. एकूणच त्यांची आताची भाषा सौम्य असली तरी त्या पंगा घेण्याच्या मुड मध्ये दिसताहेत. काही दिवस वाटले होते या बड्या दोन नेत्या मध्ये समेट झाला आहे. अलीकडच्या काळात काही छायाचित्र झळकले होते. त्यावरून, तसा अंदाज आला होता.कार्यकर्ते सुखावले होते. पण, काहीतरी गडबड दिसते. मंत्रिमंडळ विस्ताराने नाराजी नाट्याचा अंक दिसून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे, बंडात बंड होते की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे. शिंदे गटाचे काही आमदार नाराज आहेत. एवढ्याने भागत नाही म्हणून भाजपात सुद्धा नाराजीची कुजबुज होती. काल-परवा ती उघड झाली. नवे सरकार अजून ही अस्थिर आहे. जनतेला ही तेच वाटते. “महाराष्ट्र” आणखी एका बंडाच्या दिशेने चाललाय का ?