बेलापुरात पुन्हा गुटखा प्रकरण उघडकीस;एकूण 5 लाख 75 हजाराचा माल जप्त.

बेलापुरात पुन्हा गुटखा प्रकरण उघडकीस;एकूण 5 लाख 75 हजाराचा माल जप्त…
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि संजय सानप यांना गुप्त खबर मिळाल्यावरून वरिष्ठांच्या आदेशान्वये काल बेलापूर बुद्रुक गावात एका घरासमोर छापा टाकून पोलिसांनी सुगंधी तंबाखू गुटखा पानमसाला व टेम्पो जप्त केला. शेख, इनामदार, पिंजारी अशा तिघांना अटक केली असून या घटनेने गुटखा तस्करी व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबत पोकॉ. हरिश अशोक पानसंबळ यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात आरोपी रियाज रऊफ शेख, वय-३५, रा. महेशगल्ली, बेलापूर, नगऱ्या उर्फ साहिल इरफान इनामदार, वय- २२, रा. रामगड, बेलापूर बु.,ता.श्रीरामपूर, युसूफ बशीर पिंजारी, वय – ३२, रा. बेलापूर बु., मेहबूब इमाम तांबोळी, रा. बेलापूर बु. यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे मानवी जिवीतास हानिकारक खाद्यपदार्थ साठा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, गुप्त खबरीवरून दि. २२ मेच्या १.३० च्या सुमारास बेलापूर बु. येथे महालगल्ली येथील आरिफ युनूस शेख याच्या राहत्या घरासमोर पोलिसांनी टेम्पो नं. एमएच १४ एचजी ९७५७ पकडला. त्यात ३८ हजार ४०० रूपयांचा आठ पांढऱ्या रंगाच्या गोण्यांचे कट्टे प्रत्येक गोनीत २५ पुडके, प्रिमीयम राज निवास नावाचा सुगंधीत पानमसाला मिळून आला तर ८ पांढऱ्या गोन्यांत २५ पुडके त्यात जाफरानी तंबाखू पुड्या मिळून आल्या. तसेच १० पांढऱ्या गोन्यात २० पुडके विमल नावाचा सुगंधी पानमसाला गुटखा मिळून आला. तसेच २० पुडके टोबॅको तंबाखू मिळून आली. निळया रंगाच्या खोक्यात रजनीगंध नावाचा सुगंधी पान मसाला तसेच सिल्व्हर रंगाच्या खोक्यात रॉयल जाफरानी जर्दा तंबाखू ११२ पाऊच तर गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखू टेम्पोसह मिळून आला. टेम्पोसह एकूण मालाची किंमत ५ लाख ७५ हजार इतकी असून पोलिसांनी हे जप्त केले.