देश-विदेश

महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर* विशेष

*महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर* विशेष

 

आज ६ डिसेंबर २०२२ भारतीय घटनेचे शिल्पकार,दीन दलितांचा शहेनशहा,प्रकांड पंडित,प्रखर सत्यवादी,अलौकिक धैर्याचा पुरुषोत्तम,मानवतेचा कैवारी,झुंजार समाजक्रांतिकारक,शोषितांचा बलदंड महानायक,बहुभाषी ज्ञानमहर्षि,कायदेपंडित,अर्थशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ,राज्यशास्त्रज्ञ,कोट्यावधी भारतीय मूक जनतेचा ऊध्दारक,अनेक धर्माचा व्यासंगी पंडित,अवघा बहिष्कृत भारत जागा करणारा भारताचा मार्टिन ल्यूथर किंग,महात्मा गौतम बुध्द,महात्मा कबीर,महात्मा फुले,यांचा तेजस्वी  शिष्य,भारताचा तेजपुंज महापुरुष, भारतरत्न,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे.सारे राष्ट्र या महापुरूषाला अभिवादन करीत आहे.

 

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रील १८९१ रोजी मध्यप्रदेश प्रांतात इंदूर जवळ महू या गावी झाला.परंतु त्यांचे मूळगाव रत्नागिरी जिल्ह्यात, मंडणगड तालुक्यातील अंबवडे हे लहान खेडेगाव आहे.त्यांचे वडील रामजी सकपाळ ब्रिटिश लष्करात सुभेदार होते.ते मोठे तडफदार व व्यांसगी होते.आई अत्यंत स्वाभीमानी व धर्मशील होती.आई-वडिलांचे हे सारे गुण डाॕ.आंबेडकरांच्यात पुरेपुर ऊतरले होते.तेही अत्यंत स्वाभिमानी होते.लहानपणापासून त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते.मिळतील ती पुस्तके ते झपाटल्यासारखे वाचत असत.रामजी सकपाळ यांनीही आपल्या या विलक्षण बुध्दिमान मुलाची हौस पुरवायला कमी केले नाही.त्यासाठी आपल्या मुलीचे दागिने विकून त्यांनी आंबेडकरांना पुस्तके आणली.तासन् तास ते वाचनात गढून जात.तहान भूक ते विसरुन जायचे.

 

भावी आयुष्यात स्वतंत्र भारताची घटना लिहिणारा हा प्रकांड पंडित अशा वाचनाने घडत गेला.१९०७ साली ते मुंबई विश्वविद्यालयाची मॕट्रीकची परीक्षा ऊत्तीर्ण झाले.हेच एक नवल होते.कारण शेकडो वर्षे शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील एक मुलगा अशी परीक्षा ऊत्तीर्ण होतो. ही दुर्मिळ घटना होती.म्हणून त्यांच्या अभिनंदनाची एक सभा मुंबईत आयोजित केली आणि या सभेला गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळूस्कर व सी.के बोले हे आवर्जून ऊपस्थित होते.त्या दोघांनी आंबेडकरांचे अभिनंदन केले. कृष्णाजी अर्जुन केळूस्करांनी त्यांना भगवान गौतम बुध्दाचे मराठी चरित्राचे पुस्तक भेट दिले.हे बुध्दचरित्र म्हणजे  त्यांच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनेची ती जणू नांदीच होती.

 

१९१२ साली मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालतून ते अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए.झाले.पुढील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना अमेरिकेला पाठविले.अमेरिकेत प्रसंगी अर्धपोटी राहून अठरा-अठरा तास  अध्ययन करुन समाजशास्त्र,अर्थशास्त्र,मानववंशशास्त्र,इतिहास,राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.आणि अशा विपरित परिस्थितीतून एका धुरंधर राष्ट्रपुरुषाकडे त्यांचा हा झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे.असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.त्यांना शेकडो वर्षे उपेक्षित राहिलेल्या भारतीय जनतेच्या ऊध्दारासाठी अनेकाशी संघर्ष करावा लागला.महात्मा गांधी या सर्वात शक्तीशाली व लोकप्रिय नेत्याबरोबर त्यांना संघर्ष करावा लागला.वर्तुळ परिषदेत दलितांचे नेतृत्व कोण करणार यावरून त्यांनी गांधीजींच्या महात्मेपणालाच आव्हान देण्यास मागेपुढे पाहिले नाही.त्यासाठी त्यांनी शिव्याशाप,विरोध याची पर्वा केली नाही.महाडच्या चवदार तळ्यातील पाणी पिण्याचा सत्याग्रह त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत रोमहर्षक घटना होती.सी.के.बोले यांनी दलितांना सर्व समाजाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणे मुक्त असली पाहिजेत असा ठराव असेंब्लीत मांडला आणि मंजुर झाला होता.महाडच्या चवदार तळे या ठरावानुसार सर्वांना मुक्त होते.सनातनी लोकांनी दलितांना चवदार तळ्यातील पाणी पिण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले होते.आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला हिंदू समाजात परिवर्तन घडवून मागासवर्गीय समाजाचे हित,ऊत्कर्ष,साधावा असे वाटत होते.याचाच एक भाग म्हणून डाॕ आंबेडकरांनी १९२७ साली महाड येथे मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी मानवी स्वातंत्र्याचा लढा पुकारला.महाडची ही परिषद म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतीकारक घटना होती.

 

नवभारताची निर्मिती करण्यासाठी ही परिषद भरविली होती.पशूपेक्षाही हिनतेची वागणूक सहन करणाऱ्या समाजात आत्मसन्मान जागृत व्हावा म्हणून ही परिषद भरविली होती.मानसिक गुलामगिरीच्या मुक्ततेसाठी ही परिषद भरविली होती.सुमारे दोन हजार वर्षे अन्यायग्रस्त झालेला समाज हा आपले मानवी अधिकार प्रस्थापित करण्यासाठी प्रथमच चवदार तळ्याच्या काठी ऊभा ठाकला होता.चवदार तळ्यातील पाणी पिण्याचा हक्क बजावण्यासाठी प्रचंड मिरवणूक निघाली.हजारो वर्षे सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाने असे घनघोर बंड करावे हे रोमहर्षक दृश्य भारतीय इतिहासात अपूर्व व अभूतपूर्व असेच होते.संपूर्ण भारतवर्षातील एक महाविद्वान,महापंडित,प्रखर राष्ट्रभक्त,तेजपुंज ज्ञानसूर्य,जगातील मानवमुक्तीच्या लढ्यातील एकमेवाद्वितीय झुंजार योध्दा,शेकडो वर्षे सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या अभागी समाजाचा स्वातंत्र्यसूर्य आपले सारे पांडित्य,आपले सारे ज्ञान,आपली सारी विद्वत्ता,आपले सारे तेज पणाला लावून हिंदू समाजाला आवाहन करीत धर्ममार्तंडाना,सनातन्याना आव्हान देत चवदार तळ्याच्या काठी ऊभा राहिला,तेव्हा धर्मघातक्यांना घामच फुटला.आणि हजारो वर्षे अन्याय सहन करीत आलेल्या समाजाने गुलामगिरिची सारी बंधने त्वेषाने झुगारुन दिली.नवचैतन्याचा प्रथमच साक्षात्कार झालेल्या समाजाने मग एकच गगनभेदी आरोळी ठोकली “डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचा”आणि काय आश्चर्य ! तेथे ऊपस्थित समुदायाने “विजय असो”ची प्रचंड गर्जना केली.

 

नवसमाजाच्या, नवभारताच्या निर्मितीचा तो एक सुंदर क्षण होता.डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहानंतर २५ डिसेंबर १९२७ रोजी सनातन्यांना आणखी धक्का दिला.माणसा-माणसामधे भेद निर्माण करणाऱ्या “मनुस्मृतीची”जाहीर होळी केली.आणि हिंदुसमाजाच्या नव्या मांडणीचे रणशिंग फुंकले.डाॕ आंबेडकर कोणत्याही जाती विरोधात नव्हते.त्यांचा लढा विषमतेविरुध्द होता.महाडच्या सत्याग्रहाला पाठींबा देताना केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर या दोन दिग्गज ब्राम्हणेतर पुढाऱ्यांनी डाॕ आंबेडकरांना दोन अटीवर पाठींबा जाहीर केला होता.त्यातील पहिली अट होती की सत्याग्रह पूर्ण अनअत्याचारी असला पाहिजे.अर्थात ही पहिली अट डाॕ.आंबेडकरांना मान्य होती.पण दुसरी जी अट होती ती अशी होती की डाॕ आंबेडकरांनी आपल्या चळवळीतून ब्राम्हण कार्यकर्ते जे आहेत त्यांना बाहेर काढावे.मात्र ही दुसरी डाॕ.आंबेडकरांनी साफ धुडकावून लावली.आणि त्यांना ते म्हणाले” ब्राम्हण आमचे वैरी नाहीत,ब्राम्हण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत.ब्राम्हण्यरहित ब्राम्हण आम्हांस जवळचा वाटतो.”तर ब्राम्हणग्रस्त ब्राम्हणेतर आम्हाला दूरचा वाटतो.या त्यांच्या ऊदूगारावरुन डाॕ.आंबेडकरांच्या निरपेक्ष आणि विशाल अंतकरणाची आपणास साक्ष पटते.

 

म.गांधीजींच्या बरोबर १९३१ च्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने त्यांचा संघर्ष झाला होता.संपूर्ण दलित समाजाच्या वतीने बोलण्याचा काॕग्रेस व आपणाला अधिकार आहे.हे म.गांधीजींचे मत होते.डाॕ.आंबेडकरांनी हा गांधीजींचा अधिकार धूडकावून लावला.गांधीजींच्यावर जबरदस्त टीका केली.ते म.गांधीजींना म्हणाले की “आपणांसारख्या महात्म्यावर आम्ही आमच्या ऊध्दारासाठी विसंबून राहणार नाही.आम्ही आमचा स्वावलंबनाचा मार्ग चोखाळू.महात्मे धावत्या आभासासारखे असतात ते फक्त धुरळा ऊडवितात,समाजाची पातळी ऊंचावू शकत नाहीत”या आंबेडकरांच्या स्पष्ट भूमिकेमुळे सर्वत्र खूपच खळबळ ऊडाली.म.गांधीजींनी स्वतंत्र मतदारसंघामुळे समाज दुभंगेल ही भूमिका घेऊन दलित समाजाच्या स्वतंत्र मतदारसंघ मागणीस विरोध केला.आणि गांधीजींनी प्राणांतिक ऊपोषण सुरु केले.गांधीजींच्या या प्राणांतिक ऊपोषणाने सारा देश चिंताग्रस्त झाला.सर्वांचे लक्ष डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे लागले.कारण गांधीजींचे प्राण वाचविणे हे सर्वस्वी डाॕ.आंबेडकरांच्या हाती होते.एकाच वेळी डाॕ.आंबेडकरांच्यावर विनवण्या,आर्जवे,शिव्याशाप यांचा वर्षाव सुरु झाला.पंडित मदनमोहन मालवीय,राजाजी,बॕ.जयकर,तेजबहादूर सप्रु,बिर्ला यांनी यासाठी मुंबईत एका सभेचे आयोजन केले.या सर्वानी डाॕ.आंबेडकरांशी बोलणे केले.या सभेत बोलतांना  डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले “गांधीजीच्या प्राणांतिक ऊपोषणाच्या नाटकात खलपुरुषाचे काम माझ्या वाट्याला आले आहे,पण लक्षात ठेवा,रस्त्यावरच्या त्या कंदीलाच्या खांबावर जरी मला फाशी दिली. तरी मी माझ्या बांधवाचे हक्क कमी करावयास तयार होणार नाही”

 

परंतु पुढे परिस्थिती फार बिघडू नये म्हणून  तेज बहादूर सप्रु यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर तडजोडीची योजना मांडली.मोठ्या मनाने ती बाबासाहेबांनी मान्य केली.महात्मा गांधीजीशी चर्चा केली.तपशीलाबाबत खूप खळखळ झाली.परंतु ऊदार अंतकरणाने या महापुरुषाने करारावर सही केली.”पुणे करार”या नावाने तो इतिहासात प्रसिद्ध आहे.१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.आणि देशहिताला प्राधान्य देत,काॕग्रेससशी असलेले आपले सर्व मतभेद विसरुन पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री झाले.परंतु “हिंदू संहिता “बीलावरुन त्यांचे मतभेद झाले आणि मंत्रिपदाचा त्यांनी राजीनाम दिला.ते निराश आणि दुःखी झाले.हिंदू कोड बील पूर्णपणे मंजूर झाले नाही.हिंदू धर्म सुधारणेचा तो त्यांचा अखेरचा प्रयत्न होता.तसे त्यांनी १९३५ साली येवल्याच्या परिषदेत जाहिरपणे हिंदू सनातन्यांना सांगितले होते,की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी या धर्मात मी मरणार नाही.हिंदू धर्मात सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी आयुष्यभर जीवाच्या आकांताने प्रयत्न केला.परंतु हिंदू धर्मातील मार्तंडानी या प्रकांड पंडिताचा आक्रोश कधी ऐकला नाही.अखेर ते मृत्यूपूर्वी काही दिवस १९५६ साली आपल्या कोट्यावधी अनुयायासहीत  “बुध्दं शरणम् गच्छामि.सघं शरणम् गच्छामि” असे म्हणत भगवान तथागताला शरण गेले.आयुष्यभर केलेला संघर्ष,अहोरात्र अध्ययन,विद्यापीठाच्या परिक्षा,सतत व्याख्याने,भ्रमंती आणि मधुमेह यांनी त्यांचे शरिर थकत गेले.अखेर वयाच्या पासष्टाव्या वर्षी गुरुवार दिनांक ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्रखर देशभक्त होते.आधुनिक भारताचे ते शिल्पकार आहेत.प्रखर सत्य रोखठोक शब्दांत निर्भयपणे सांगणारा त्यांच्या सारखा दुसरा समाजचिंतक या देशात दुसरा झाला नाही.ते व्यक्तीपूजनाच्या विरोधी होते.बुद्धीची व मानवतेची पूजा करा,असे ते सांगत.”शिका सघटीत व्हा,संघर्ष करा.”असा त्यांचा मंत्र होता.अशा या महापुरुषांस त्यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी माझे कोटी कोटी प्रणाम

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे