यात्रेसाठी गंगाजल घेवून जाणार्यांकडून कलिंगड वाडीचे नुकसान.

यात्रेसाठी गंगाजल घेवून जाणार्यांकडून कलिंगड वाडीचे नुकसान.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील कलिंगड उत्पादक शेतकर्याचे यात्रेनिमित्त गंगाजल घेवून जाणार्या यात्रेकरूंनी कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आले. ही घटना शुक्रवार दिनांक १५ रोजी रात्री घडली आहे.
टाकळीभान येथील शेतकरी रोहिदास वामन बोडखे यांची बेलपिंपळगांव रस्त्यालगत जमीन असून इरिगेशन कॅनाॅल नजीक गट नं २९ मध्ये त्यांनी दोन एकर कलिंगडाची वाडी केलेली आहे. अथक परिश्रम व योग्य व्यवस्थापन करून त्यांनी कलिंगडाचे पिक जोमाने आणले आहे.
या कलिंगड पिकाला चांगल्या दर्जाची फळे लागलेली आहेत व थोड्याच दिवसात विक्रीसाठी कलिंगड काढले जाणार होते. सध्या बाजारभाव बरा असल्याने खर्च वजा जाता चार पैसे पदरी पडतील अशी आशा असतानाच शुक्रवार दि.१५ एप्रिलच्या रात्री घोगरगावकडून गंगाजल घेवून जाणार्या यात्रेकरूकडून कलिंगडाची नासधूस करण्यात आली आहे.
या गंगाजल घेवून जाणार्या यात्रेकरूंनी परिपक्व न झालेले असंख्य कलिंगड तोडून रस्त्यावर ठिकठिकाणी फेकून दिले आहे. शनिवारी सकाळी विलास बोडखे हे शेतात आले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी सोळा चारी रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कलिंगड पडलेले दिसून आले.
जीवापाड जपलेल्या पिकाची अशा प्रकारे झालेली नासाडी पाहून त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. सध्या गावोगावी यात्रौत्सव साजरे होत आहे. या निमित्ताने प्रत्येक गावातून हजारो भाविक भक्त गंगाजल आणण्यासाठी गोदावरी नदीवर येतात. रात्री परतीच्या प्रवासात गंगाजल नेण्यासाठी असणार्या भाविक भक्तात मोठ्या प्रमाणात हौशे नवशे व गवशेही सामील असतात. आणि याच टोळ बहिर्यांकडून सदर वाडीचे मोठ्या प्रमाणात नूकसान करण्यात आले आहे.
सध्या परिस्थितीत रानडुकरांसह इतर प्राण्यांपासून पिकांचे रक्षण शेतकरी करीत आहे. त्यातच माणसांकडूनच अशा प्रकारे कृत्य केले जात असेल तर शेतकर्यांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हजारोच्या संख्येने रात्रभर या भागातून गंगाजल घेवून जाणार्यांनी कलिंगड वाडीची नासाडी केली आहे त्यांनी कलिंगड खाण्यापेक्षा नासधूसच मोठ्या प्रमाणात केली आहे त्यामुळे या शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या झालेल्या प्रकारा बद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
टाकळीभान— यात्रेसाठी गंगाजल घेवून जाणार्यांनी येथील शेतकर्याच्या कलिंगड वाडीतील कलिंगडे रस्त्यावर फेकून देण्यात आली आहेत.