पंचमी तिचं पण रंगत मात्र बदललीय मानाचा झोका कालबाह्य*

पंचमी तिचं पण रंगत मात्र बदललीय मानाचा झोका कालबाह्य*
काही वर्ष आपण मागे गेलो तर असा एक काळ होता कि पंचमी कधी जाणार पंचमी कधी येणार ह्या अशा चर्चा साधारण एक महिना भर चालायच्या हे शब्द आपल्या लाहनपणी आपण ऐकले देखील आहेत . मानाच्या झोक्याची हवा तर घरा घरात गावागावात वाडी वस्ती तांड्यावर असायची.झोका नाहीअसं घर नव्हतं . काय तो झोका काय ती पंचमी सगळं कसं ओके होत .पण सध्या हे ओके नाही तर नावा पुरतच उरलय का ? असं वाटतंय कारण हि सगळी रंगत जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे .फक्त आठवणी शिल्लक आहेत असंच काहीसं वाटतंय .आपल्या धर्म शास्त्रानुसार आपण अनेक वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो. परंतु त्या त्या सण उत्सवांच्या निखळ निरागस आनंदाला मात्र आपण दिवसेंदिवस परके होत चाललोय.आपण सुधारीत झालो प्रगतशील झालो अगदी चंद्रवर पोहचलो .पण याच बरोबर जीवनातील निरागस आनंदाला मात्र मुकलो .हे वास्तव नाकारता येणार नाही मी दिनदर्शिका पाहिली उद्या पंचमी आहे दिसलं म्हणून समजलं पण पुर्वी एक महिन्या पासून पंचमीची हवा होती .ती हवा तर सोडाच पण हल्ली पंचमी आहे कि नाही हेच लक्षात येत नाही .म्हणून पंचमी तिचं आहे पण रंगत मात्र नक्कीच बदलत चालली आहे म्हणजे दिवसेंदिवस कमी होत आहे .कित्येक महिन्यांपासून ज्या पंचमीची वाट पाहिली जायची पंधरा वीस दिवस गावात सगळीकडे झोकेच झोके गावांत अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या घर सापडायचे ज्या घरी किंवा शेतात झोका नसेल उर्वरित गाव आणि शिवार झोक्यांनी फुलुन निघायचा .
मंदिराच्या आवारात दर्शन रंग असावी तशी मानाचे पाच झोके घेण्यासाठी रांग असायची अशी रंगतदार पंचमी एक पर्वणीच होती .हल्ली पंचमी कधी आली आणि कधी गेली हेही कळत नाही . फक्त औपचारिकता म्हणून आपण सण उत्सव साजरे करतो आहेत असंच काहीस वाटत.अगदी रखरखत्या ऊन्हाळयातील आखीदीचा ( अक्षय तृतीया) सण संपला कि माहेरवाशिणीला पंचीमीसाठी माहेरी जाण्याचे वेध लागायचे आणि ती अगदी चातका पक्षा प्रमाणे पंचमीच्या सणाची आणि माहेरच्या लोकांच्या भेटीची ओढ घेऊन दिवस मोजायची अगदी उन्हाळ्यात चातक पक्षी ज्या पद्धतीने मृगाच्या पहिल्या पावसाची वाटअगदी मग्न होऊन पाहतो .पंढरीचा वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर ला कोणत्याही परिस्थितीत जाण्यासाठी आडाखे बांधत असतो . त्याच्या पद्धतीने माहेरवाशिण हि पंचमीच्या सणाला कोणत्याही परिस्थितीत माहेरी जाऊन झोका खेळणारच या आंनद विश्वात आपलं दैनंदिन दुःख विसरून रममाण होत असे
माहेरीचा झोका तीला क्षणोक्षणी खुणावतअसे ह्या सगळ्या वाट पाहण्याच्या खेळात अगदी पंचमी तोंडावर येत असे .हि रंगत प्रचंड निराळी होती .याच दरम्यान निसर्ग अगदी हिरवा शालू नेसून सज्जा असतो .
सगळीकडे पाणीच पाणी आणि हिरवळ असल्याने मन प्रसन्न प्रसन्न अशातच गुचकी लागली किंवा कोणीही दिसलं कोणत्याही गाडीचा आवाज काणी पडला तर आपल्याला घेण्यासाठी मुराळी आला असा भास होण अगदी स्वभाविक आणि अपेक्षित होत.
अनेक दिवसांपासून रोज रोज क्षणोक्षणी डोळे लावून ज्या मुराळ्याची वाट पाहत असे तो मुराळी अखेर पाहचाला कि मग आनंदाला भरत येत असे आणि त्या दिवशी ची रात्र अंखड जागत सकाळची वाट पाहत पाहत स्वप्नात हरवलेली माहेरवाशीण सकाळ झाली कि अगदी लगबगीने आपलं सगळं उरकुन माहेरच्या वाटेने मार्गक्रमण करत असे अनेक सख्या बालपणीच्या आठवणी सगळ्या मैत्रिणी काय ते विश्व या सगळ्या आठवणीत मग्न झाल्यावर गाव आल्यावरच समजयाच हि गंमत खुपचं निराळी असायची
मग सुरवात होई ती रस्त्यावरील प्रत्येक घरातील परिचित अपरिचित माणसांना काही तरी संवाद साधयचा असं होता होता घर येई.आणि मग डोक्यावर असणारं खुप मोठं ओझं अगदी हालक हालक वाटत असे संध्याकाळी हातांवर मेहंदी सकाळी गावभर भेटी अनेक ठिकाणी झोकयाचा ठेका मनोभावे वारूळाची पुजा कसल दुःख कसला तणाव काही नाही अगदी लहान बालका सारखं जीवन जीवनातील सगळी सुख दुःख विसरून फक्त मन बालका होऊ अंनद मग्न असायच . पण आता हे सगळं कुठे राहील आहे . फक्त आठवणी शिल्लक आहेत.पंचमी घरात लावलेल्या दिनदर्शिकेवर दिसते . औपचारिकता म्हणून विधिवत पूजा झाली पंचमी कुठं साजरी झाली हे पण लक्षात येत नाही .
हल्ली म्हणजे एकंदरीत सण उत्सव हे दुःख विसरून मंत्र मुग्ध होऊन आनंद लुटण्यासाठी असतात हे आपण विसरलो आहेत. फक्त औपचारिकता म्हणून आपण हे सगळं साजर करतोय .रूढी परंपरा आहेत म्हणून पुढे चालवतो आहेत.पण त्यामधील खरया आनंदाला मात्र आपण मुकलो आहोत हे नाकरता येणार नाही. निरागस आनंद लुटायचा सोडून आपण भौतिक तंत्रज्ञान युगाच्या जोखडात असो अडकलो आहेत कि प्रत्येक बाबतीत खरया अर्थाने आनंदाला आपण मुकलो आहोत.