भाव वाढीच्या आशेने कापसाचा साठा करण्यावर शेतकर्यांचा कल

भाव वाढीच्या आशेने कापसाचा साठा करण्यावर शेतकर्यांचा कल
कापसाला मिळणारे सुमारे आठ हजार रूपये प्रति क्विंटलचा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडण्याजोगा नाही. येत्या दिवसांत दरवाढ होण्याची शक्यता असल्याने काही शेतकर्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. गरजेपुरताच कापूस विकला जात असल्याने आवक घटली आहे.
मागील वर्षी 14 हजारांवर दर पोहोचल्याने अनेक शेतकर्यांनी सोयाबीनऐवजी कपाशीला पसंती दिली. बीड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद मराठवाड्यात कपाशीची लागवड वाढली. जिल्ह्यात बर्यापैकी कापसाचे क्षेत्र वाढल्याने यंदा कापसाचे भाव घसरले. शेतकर्यांना प्रती एकरी सरासरी पाच ते सहा क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले आहे. सुरूवातीच्या काळात कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाचा फटका या नैसर्गिक वातावरणामुळे शेतकर्यांना उत्पादनात घट झाली. अधिक भाव मिळाल्यास ही घट भरून निघले या आशेवर शेतकरी होता. परंतु कापसाचे भाव आठ हजार ते साडेआठ हजाराच्या वर पोहोंचलेले नाहीत. बि-बियाणे, मजुरी आणि कापूस वेचणीचा खर्च वाढला आहे. उत्पादन खर्च वाढला असताना दर मिळत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कोरोनाकाळात पीपीई कीट, चादरी आणि कापडे तयार करण्यासाठी अधिक कपाशी वापरली गेली. कोरोनाकाळातील कापडाची विल्हेवाट लावली गेल्याने नव्याची मागणी वाढली. या गोष्टींमुळे मागील वर्षी कपाशीला चांगला भाव मिळाला. यंदा भाव कोसळताच शेतकरी जास्त दराची प्रतिक्षा करीत आहेत. आवक मंदावल्याने सुत गिरण्या मागील वर्षीचा कापूस वापर आहेत. कापसाची आवक बाजारात दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काही शेतकर्यांनी आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील या आशेवर कापसाचा साठा करून ठेवलेला आहे.