शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही : उपवनसंरक्षक – सुवर्णा माने*

*शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही : उपवनसंरक्षक – सुवर्णा माने*
*’स्नेहबंध’तर्फे छावणी परिषद शाळा, परिसरात वृक्षारोपण*
प्रतिनिधी मोहन शेगर
*अ.नगर – वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली, परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. वाढत्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने भिंगार येथील छावणी परिषदेच्या सरदार वल्लभभाई शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी माने बोलत होत्या. याप्रसंगी ‘स्नेहबंध’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, मुख्या. संजय शिंदे, मुख्या. राजू भोसले, शिक्षक शरद पुंड, अंकुश शेळके, अरविंद कुडिया, वैशाली शिंदे, सोनाली झिरपे, अश्विनी यादव उपस्थित होते. माने म्हणाल्या वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढलीय. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात. म्हणूनच वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा.*
*झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच…*
*झाडे जगली तरच शहराचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहील. झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक आहे. कारण कोणत्याही सरकारी यंत्रणेने झाडे लावली तरी प्रत्येक झाडावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. नागरिकांनीच सहकार्य कले तर निम्म्यापेक्षा अधिक झाडे जगू शकतील. त्यामुळे वृक्षसंवर्धनाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.*