रास्तारोको प्रसंगी रस्त्यावर दुध ओतुन कंपनी धार्जीण्या सरकारचा दुध उत्पादकांकडून निषेध

रास्तारोको प्रसंगी रस्त्यावर दुध ओतुन कंपनी धार्जीण्या सरकारचा दुध उत्पादकांकडून निषेध
टाकळीभान (प्रतिनिधी) – दुध दराच्या तुलनेत दुधापासुन तयार उत्पादनाचे दर जैसे थे ठेवणार्या कंपनी धार्जिण्या सरकारचा रस्त्यावर दुध ओतुन निषेध करत शासनाने गायीच्या दुधाला ४० रुपये हमीभाव द्यावा या आणी विवीध मागण्यांसाठी खैरी निमगांव येथील वाघाई देवी ओढ्याजवळ दुध उत्पादक शेतकर्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
दुधाला ४० रूपये हमीभाव मिळावा. पशुखाद्याचे दर ५० टक्क्यांनी कमी करावे. पशु औषधे जिएसटी मुक्त करण्यात यावे. शासनाने सर्व प्रकारचे लिंग निर्धारीत विर्यमात्रा माफक दरात उपलब्ध करून द्यावेत. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने अद्यापपर्यंत किती भेसळखोरांवर काय कारवाई केली याची श्वेतपत्रिका काढावी. शासकिय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वच खाजगी, सहकारी प्लॅन्टचे दरमहा ऑडीट घ्यावे आणी संकलन तसेच बायप्रॉडक्टची माहीती सार्वजनिक करावी. अन्न भेसळ अधिकार्यांची इडी चौकशी करावी. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्या प्लॅन्टचालकांवर कारवाई करावी. पशुखाद्य तसेच पशु औषधे यांची गुणवत्तेनुसार किमान आणी कमाल आधारभुत किंमत ठरवण्यात यावी. टोन्ड दुधावर बंदी घालण्यात यावी या मागण्यांसाठी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन सुरु झाले. दरम्यान या आंदोलनात गावातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी महसुल प्रशासनाच्या वतीने मंडलाधिकारी बाळासाहेब वायखींडे उपस्थीत होते. प्रशासनाच्या वतीने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी निवेदन स्विकारले. रास्तारोको प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली मात्र पोलीसांचा मोठा फौजफाटा असल्याने वाहनचालकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत गर्दीतुन मार्ग काढला. आंदोलनकर्त्यांनी पोलीसांचे आभार मानले.