शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन – सुरेशराव लांबे पाटील
शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन – सुरेशराव लांबे पाटील
राहुरी : मुळा उजवा कालवा कार्यक्षेत्रातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी राहुरी चे तहसीलदार राजपूत यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी अनेक भागासह मुळा उजवा कालवा लाभक्षेत्रात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, ज्या काही भागात पेरणी झाली त्यानंतर पुन्हा पाऊस न झाल्यामुळे पिके जळून चाललेली आहेत. गेली चार वर्षांपासून शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. त्यात त्यांची पिके वाया गेल्यास मुक्या जनावरांनाही चारा मिळणार नाही व जनवारांसह शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ येईल. म्हणून 22 ऑगस्ट 2023 रोजी मुळा उजवा कालवा आवर्तन त्वरित सोडावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली असता त्या मागणीचा विचार दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत झाला व तसे आदेश संबधितांना दिले.
या आदेशात दि. 05 सप्टेंबर 2023 पासून पुढील 20 दिवसांपर्यंत कालव्यावरील शेतकऱ्यांचे शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल असा अन्याय कारक आदेश देण्यात आला. यात मुळा उजवा कालवा कार्यक्षेत्रातील मुळा पाटबंधारे उपविभागातील राहुरी 27 रोहित्र, घोडेगाव 6 रोहीत्र, नेवासा 63 रोहित्र, चिलेखनवाडी 35 रोहित्र, अमरापूर 91 रोहित्र अशी एकूण 222 रोहित्र बंद करण्याचे आदेश विद्युत महावितरण कंपनीला देण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.
तरी हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय त्वरित मागे घेऊन शेती पंपाला पूर्ण दाबाने अखंड आठ तास विद्युत पुरवठा देऊन मुळा उजवा कालवा वरील शेतकऱ्यांची शेती पंपाचा विद्युत पुरवठा चालू ठेवण्यात यावा. अन्यथा सर्व पीडित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ नगर मनमाड रोड मुळा उजवा कॅनल या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देत शासन व प्रशासन यांनी या ज्वलंत मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा निर्णय त्वरित मागे घेऊन आंदोलन करण्यास भाग पाडु नये असा विनंतीपुर्वक इशारा शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जलसंपदा, ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तथा महसूल मंत्री, जिल्हाधिकारी अहमदनगर, अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, अभियंता विद्युत महावितरण अहमदनगर, मुळा पाटबंधारे उपविभाग अभियंता राहुरी, विद्युत महावितरण उपअभियंता श्रीरामपूर विभाग व राहुरी विभाग आदी कार्यालयांना पाठविण्यात आल्या आहेत.