क्रिडा व मनोरंजन

ओला स्पर्श*

*ओला स्पर्श*

घराच्या उंबऱ्यातच अडकून बसलेली माधवी दिवसभर कुटुंबासाठी खपायची.वर्ण गोरा गोमटा,कुरळे केस, सुडौल बांधा, बोलके डोळे, उंचापुरी अशी ती. तिचं सौंदर्य अगदी साध्या साडीतही खुलून दिसायचं.मनात असतानाही साजशृंगार करायला स्वतःकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळायचा नाही.कितीतरी आवडीच्या गोष्टींना नाईलाजाने ती मुरड घालायची.

                  तिची दिवसाची सुरुवात सूर्य उगवण्याआधीच व्हायची. अंगण झाडात झाडता झाडीतून तिला भास्कर खुणावत असल्याचा भास व्हायचा. तिलाही त्याचं सोनेरी रूप आवडायचं अन ती त्याच्यावर फिदाही व्हायची.थोडं तरी त्याला आपल्या नजरेत भरावं यासाठी तिची धडपड चाललेली असायची.तोवरच आतून सासऱ्यांचा आवाज यायचा.

“सुनबाई अंघोळीला पाणी काढलं की नाय अजून?कुठं झाडीत डोळं लावून बसला हायसा.”

       त्या आवाजाने माधवी भानावर यायची.अंघोळची पाणी नान्हीत ठेवून घरात जाताना तिची नजर गोठयातल्या गाईकडे जायची.तिचं वासराला जवळ घेऊन चाटत असताना फुटणारे वात्स्यल्य सडातून पाझरायचं.तो मायेचा पाझर तिला माहेरच्या वाटेवर घेऊन जायचा.धार पिळतानाचा येणारा चूळ चूळ आवाज तिच्या मनात खोल एक विशिष्ट नाद निर्माण करायचा.

                    तोवर सासूबाई काठी आपटतच बाहेर यायच्या.

“चहा लवकर ठेवून स्वयंपाकाला लाग बरं.दिवस कुठं आलाय त्याकडं बघावं जरा. माधवला कामाला जायचं हाय.लेकरं उठायच्या आतच भरभर उरकावीत होतील तेवढी कामं.”

                   ती काहीच न बोलता घरात जायची. चहा ठेवून स्वयंपाक करण्यात गुंतायची.लगेच मनीमाऊ तिच्या पायाशी लुडबुड करायची.तिची मुकी भाषा जणू तिला कळत होती. तसं तर त्या दोघींची छान गट्टीच जमली होती.माऊच्या पुढे दूध ठेवताच डोळे झाकून मिटक्या मारत ते प्यायची. तिला ती निरखायची.मऊ कापसाचा गोळा ठेवल्यागत तिला वाटायचं.तिचं आतून गुरंगुरण खूप भावायचं.

                     माधव तिला बाथरूम मधूनच आवाज द्यायचा. 

“माझे कपडे आणून देतेस का माधवी?”

तशी ती हातातलं काम सोडून धावतच त्याच्याकडे जायची. कपडे हातात देताना त्याच्या डोळ्यात डोळे घालायची. तिला आपलं सगळं जगच त्या डोळ्यात दिसायचं. तिची सगळी स्वप्ने त्या डोहाताच सामावली असल्याचा भास तिला व्हायचा. नकळत होणारा त्याचा ओला स्पर्श तिच्या सर्वांगाला शहारून जायचा.

                      कुठेतरी दूर निसर्गाच्या कुशीत त्याच्यासोबत एकांतात हरवून जावं. पावसाच्या सरीत दोघांनी ओलेचिंब व्हावं .सहचारिणी तर कधी मैत्रीण होऊन अल्लड चाळे करावेत. मनसोक्त हसावं तर कधी आत दाबलेल्या हुंडाक्याला मोकळी वाट करून द्यावी. तो हात काही क्षण तरी माझ्या हातात असावा.असं तिला किती वेळा वाटायचं. एक दिवस तरी वर्षातला माझ्या मनासारखा असावाअसं ती माधवला बोलून जायची. 

“खूप कामं असतात गं ऑफिसमध्ये

जाऊ कधीतरी.”

असं म्हणत तो विषय बदलायचा.

         मुले हळूहळू मोठी होत गेली. त्यांनी चांगलं घडावं यासाठी ती आपल्या जीवाचं रान करत होती. त्याचं शिक्षण,खाणं पिणं, हट्ट, लाड तिच पुरवत होती.सुट्टीच्या दिवशीच थोडा बहुत वडिलांचा सहवास त्यांना लाभत होता.शेतातील कामाचे नियोजनही आई वडील थकल्याने त्यालाच पहावे लागत होते. 

                     मुले मोठी होताच शिक्षणासाठी बाहेर पडली. आईच्या भोवती गलका करणारी ती आता स्वतःच्या विश्वात गुंग झाली होती. तिला मात्र जवळचं काहीतरी हरवलंय असं वाटू लागलं. सासरे सासूबाईची सेवा व घरकाम करत ती दिवस ढकलत होती. अधूनमधून घरासमोर लावलेल्या फुलांच्या छोट्या बागेत ती चकरा मारायची.तो फकत तिच्या आवडीचा,आनंदाचा क्षण असायचा.पानांफुलावरून मायेने हात फिरवायची. वाऱ्याची मंद झुकूळ अंगावर झेलत ती काहीतरी पुटपुटत राहायची.फुलांच्या पाकळ्या ओंजळीत घेऊन सुगंध खोल श्वासात भरायची.त्याच पाकळ्या आपल्याच अंगावर टाकायची.सुकलेल्या तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज झळकायचे.

                 माधव सेवानिवृत्त झाला .मुले आता नोकरीला लागली. माधववरची जबाबदारी कमी झाली.मुलांबाबतचे माधवीचे स्वप्नही पूर्ण झाले होते. आता तरी माधव माझ्यासाठी वेळ देईल .तारुण्याच्या वेलीवर पाहिलेलं स्वप्न आयुष्याच्या या वळणावर तर साकार होईल असं तिला सारखं वाटत होतं. माधवकडे तिला सांगायला तसं कारणही आता उरले नव्हते .”नक्की जाऊ” असा माधवने तिला शब्द दिला होता.सगळे कसे छान चालले होते.पुढे वृद्धापकाळाने सासू सासरे देवाघरी गेले.मुलांची लग्ने थाटामाटात झाली.मुले सुना नोकरीच्या गावी राहू लागली.माधवी आणि माधव अधूनमधुन त्याच्याकडे जात असत.पण लगेच परत येत कारण, गावाकडची माणसं अन मातीवर त्यांचे मनापासून प्रेम होते. सिमेंटच्या भिंतीत त्यांचे मन कधी रमतच नव्हते.

                एक दिवस माधवी लवकर उठली.आज तिचा तो स्वप्नातला दिवस प्रत्यक्षात साकार होणार होता. काळेपांढरे झालेले केस तिने धुवून मोकळे सोडले होते. तिला आवडणारी निळ्या रंगाची साडी घातली होती.माधवला हाक मारली आणि ती अंगणात गेली.मोगऱ्याच्या फुलांचा सुवास श्वासात भरला. त्याचा गजरा करून ती आज केसात माळणार होती. अंगण झाडून सडारांगोळी झाली. तरी माधव-अजून का उठला नाही म्हणून परत तिने हाक मारली. काहीच प्रतिसाद नाही. तशी ती थोडी घाबरलीच. जवळ जाऊन तिने त्याला जोरात हलवले. तरी त्याची काहीच हालचाल दिसली नाही तशी ती जोरात किंचाळली.आजूबाजूचे शेजारी पळतच त्यांच्याजवळ आले.डॉक्टराना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करताच माधवला झोपेत मृत झाल्याचे घोषित केले.मृत्यूचे कारण बहुतेक ह्रदय विकार असावा असे बोलून ते निघून गेले.तसं तिथे उभा असलेली माधवी एकदम कोसळली.तिला आता अवतीभोवती सगळा अंधार दिसू लागला. ती रडत होती, ओरडत होती. माधवला जोरजोरात हलवत होती .

“असं कसं झालं? सगळंच कसं संपलं.आता मी कोणासाठी जगावं असं म्हणत ती आक्रोश करत होती, किंचाळत होती.मोगऱ्याची फुले हातातलं ताट निसटून तिथेच विखुरली होती. जसं तिचं स्वप्नच तुटाव. ती विन्मुख झाली पण काहीच उपयोग नव्हता. वास्तव तर स्वीकारावे लागणारच होते.मुलांना ,नातेवाईकांना कळविण्यात आले. हे असे माधवचे जाणे अनपेक्षित घडल्याने सर्वांसाठी हा मोठा धक्काच होता. सर्व विधी उरकण्यात आले. मुलांना फार काळ गावाकडे रहाणे जमणार नव्हते. 

      आईला एकटेच गावाकडे कसे ठेवायचे म्हणून त्यांनी तिला सोबत नेण्याचे ठरवले. माधवी एकदम शून्यात हरवल्यासारखी झाली होती. तिच्या मनात नसतानाही ती मुलांसोबत शहरात गेली. पण तिचं मन गावाकडे धाव घेत होते. माधवसोबतच्या अनेक आठवणी मनाला पोखरत होत्या. तिला अन्नपाणी गोड लागत नव्हते.सुना मुलांनी तिला खूप समजावले पण तिच्यात काहीच फरक पडत नव्हता.तिचे डोळे खोल खोल गेले होते. शरीर अगदीच कृश झाले होते.

               दुपारची वेळ होती. आजूबाजूला शांतता होती. माधवी बाहेर हॉलमध्ये बेडवर पडून होती. त्या शांततेत एक सुरेल स्वर तिच्या कानी पडला. तिला काहीतरी गवसल्याचा भास झाला.तिने खिडकीतून खाली पाहिले. इमारतीच्या खाली असणाऱ्या छोट्या बागेत बाकड्यावर एक आजी बसल्या होत्या. त्या गाणे गात होत्या. माधवीला त्यांना भेटावं असं वाटू लागलं. अंगात अवसान आणून हळूहळू ती खाली आली. साधारण ऐशीच्या वयातल्या त्या असाव्यात. त्यांनी अंगावर फिक्कट गुलाबी रंगाची साडी घातली होती. पांढऱ्याशुभ्र केसांचा चापून चोपून अंबाडा बांधला होता.त्यावर खोचलेले लाल रंगाचे फुल फारच शोभून दिसत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या पण तेज होते. गोऱ्या रंगावर लाल कलरची टिकली शोभून दिसत होती. माधवी त्यांच्या समोरच्या बाकड्यावर बसली आणि त आजीकडे एकटक नजर लावून पाहू लागली. आजी गाणे गाण्यात तल्लीन झाल्या होत्या. माधवीही त्या गाण्यात हरवून गेली होती. विस्कटलेले केस, चुरगळलेला पदर ती कसातरी सावरत होती. 

                     थोडया वेळाने आजींनी डोळे उघडले. तशी माधवी त्यांना पुढे दिसली. जणू तिने काहीच न बोलता तिच्या डोळ्यावरून तिचे दुःख जाणले होते. माधवीला जवळ बोलावताच ती त्यांना बिलगून खूप रडली. आजींने तिच्या सर्वांगावर मायेने हात फिरवला. तिला आपलं दुःख आता हलकं वाटू लागलं.

                  मनातलं सगळं ती त्याच्यापुढे ओकत राहिली. आजी ते शांत चित्ताने ऐकू लागल्या.

“आजींनी तिला एक वाक्य सांगितले. हा जन्म पुन्हा नाही.जी परिस्थिती आपल्या वाट्याला आली आहे ती स्वीकारून पुढे जा. स्वतःच दुःख कधीच मोठं करू नकोस.आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जग. जोपर्यंत शरीरात श्वास चालू आहे ना तोपर्यंत. माझा एकुलता एक मुलगा अपघातात गेला. दोन वर्षापूर्वी पती गेले.मी आता घरात एकटीच राहते. कोणाचीही सोबत शेवट पर्यंत लाभेल असे होत नाही. मी वास्तव स्वीकारले. स्वतःला वेगवेगळ्या छंदात गुंतवून घेतले. दिवसाचा काही वेळ मी समाजसेवेत घालवते. महिला मंडळ, भजनी मंडळात मी सहभागी होते. एकमेकींशी संवाद साधला की दुःख हलके होते,वेदनेवर फुंकर घालता येते. सुखाचे क्षण अनुभवता येतात.तू टाकून दे तुझ्या मनातील मळम.जग भरभरून. दुःख स्वतःच हसरे करावे लागते बाई. त्यासाठी कोणी दुसरे येत नाही.”

असं म्हणत आजी उठल्या. त्यांची आश्रमात जायची वेळ झाली होती.

                     माधवी त्या उठल्या तरी तिथेच बसून राहिली. आज कित्येक दिवसांनी ती बाहेरची मोकळी हवा अंगावर घेत होती. तिला आतून एक आवाज येत होता.

“ऊठ माधवी ऊठ. स्वप्न अजून तसंच आहे.”

 ती उठली घरात जाऊन आरशासमोर उभी राहिली.,स्वतःचे रूप पाहून तिलाच कसतरी झालं.बसलेल्या गालपाडात आणि विस्कटलेल्या केसात ती बेसूर वाटत होती.एवढी तिची अवस्था वाईट झाली होती. तिने आज केस विंचरले,छान साडी घातली. कपाळाला टिकली लावली. तिच रूप त्या ही अवस्थेत छान दिसू लागलं.

                 संध्याकाळी मुले सुना आईत झालेला बदल पाहून अवाक झाली पण, मनातून सगळ्याना आनंद झाला. आईनेच आज सगळ्यासाठी छान स्वयंपाक बनवला. जेवण झाल्यावर तिने आपल्या मनातील विचार मुलांना बोलून दाखवला.

“इथे शहरात राहण्यापेक्षा मी गावाकडे एकटी राहीन. तिथेच माझे मन रमते. अधूनमधून तुम्ही मला भेटायला येत चला.कारण माझं उर्वरित आयुष्य मला माझ्या मनासारखं जगायचे आहे.”

मुलांनीही आईच्या विचारांचे कौतुक केले.

                  ती गावाकडे आली. अंगणात तिला तिचा माधव वाट पाहत असल्याचा भास झाला. पण तिनं स्वतःला सावरलं. घर ,अंगण साफ केलं. तुळशीला ,फुलझाडांना पाणी घातले.सूर्य मावळतीला आला होता. तो सोन्याचा गोळा डोंगराआड जात होता.ती त्याच हे रूप किती वेळ डोळ्यात साठवत होती. तिला उठवणार आज कोणीच तिथे नव्हतं. चुलीवर केलेली भाकरी तिनं चांदण्याच्या प्रकाशात खाल्ली. तो चांदवा तिच्याशी गुज करत होता.

हळूहळू तिने महिलांचे बचत गट सुरू केले. कुटुंबाला आर्थिक आधार देता देता त्या एकत्र येऊ लागल्या. अनेक विषयांवर चर्चा होऊ लागल्या. मनातलं सारं माधवी जवळ खोलू लागल्या. ती ही त्यांचा मायेचा आधार बनून गेली होती.

            आज अचानक आभाळात काळे ढग जमा झाले होते. मातीचा मृदगंध पावसाची चाहूल देऊन गेला.पायरीवर बसून माधवी तो वास खोल श्वासात भरत होती.पावसाची रिमझिम सुरू झाली. त्या पावसात ती भिजत राहिली. तिने डोळे मिटून घेतले. तिचं अपूर्ण स्वप्न आज साकार होत होतं पण तो जवळ नव्हता. तिने आपलाच हात सर्वागावर फिरवला. त्या पांढऱ्या केसांतून ओघळणाऱ्या थेंबात ती हरवून गेली.हरवून गेली.

 

लेखिका-©®रंजना सानप

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे