शिक्षकाने अधी स्वत: मध्ये संस्कार आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देता येतात- ह.भ.प मस्सानाथ महाराज घोगे

शिक्षकाने अधी स्वत: मध्ये संस्कार आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देता येतात- ह.भ.प मस्सानाथ महाराज घोगे
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय शाळेस ह.भ.प मस्सानाथ महाराज घोगे यांची सदिच्छा भेट
गेवराई ( प्रतिनिधी ) संस्कार प्रथम स्वतःमध्ये असावे त्यानंतर विद्यार्थ्यांना देता येतात. त्यामुळे शिक्षकाने अधी संस्कारी व्हावे. ज्या प्रमाणे आपला पाल्य हा यशस्वी झाल्यानंतर पालकाला अभिमान वाटतो त्या प्रमाणे शिक्षकांना ही आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला पाहिजे असे कार्य शिक्षकाने शिक्षकी पेशेत करावे असे प्रतिपादन चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प मस्सानाथ महाराज घोगे यांनी केले.
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत गुरूवार दि.19 रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी ह.भ.प लगड महाराज, डॉ.सुभाष ढाकणे, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले, भागवत साकळे आदींची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ह.भ.प मस्सानाथ महाराज घोगे म्हणाले की, मी ही शिक्षक होतो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मी मोफत शिक्षण दिले आज माझे विद्यार्थी हे विदेशात असून काही गेवराई शहरात डाॅक्टर होऊन जनतेची सेवा करीत आहेत. यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. ज्ञानार्जन हे सर्वात मोठे कार्य असून हे कार्य कोणत्याही अपेक्षे पोटी न केल्यास नंतर याचे फळ नक्कीच मिळाल्या शिवाय राहणार नाही. पालकांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे घरातून मिळालेल्या संस्कारातून आपला मुलगा किंवा मुलगी ही चांगल्याप्रकारे संस्कारी होईल असे त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये कसे संस्कार द्यावे या संदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर येवलेकर यांनी केले. यावेळी भागवत सोळुंके, श्रीमती अंजली माने, नवनाथ घुगे, हरीभाऊ आघाव, श्रीमती वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे आदींची उपस्थिती होती.