भेर्डापूर येथे औषध प्राशन करून शेतकर्याची आत्महत्या

भेर्डापूर येथे औषध प्राशन करून शेतकर्याची आत्महत्या
शेतीच्या बांधावरून तसे इतर अन्य कारणावरून शेजारी असणार्या शेतकर्याच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेतकर्याने कपाशीवरील फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील भाऊसाहेब नामदेव जंजीरे (वय 70) हे त्यांच्या गट नं. 319 या शेतात राहत आहेत. भाऊसाहेब जंजिरे यांच्या शेता शेजारी रमेश कवडे यांचे शेत आहे. ते शेजारी राहतात. शेताच्या बांधावरून व कुठल्या ना कुठल्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच भांडणे होत असत. दि. 29 नोव्हेंबर रोजी 8 च्या सुमारास भाऊसाहेब नामदेव जंजीरे, तसेच त्यांची पत्नी हे शेतात होते. भाऊसाहेब जंजिरे गव्हाला पाणी भरत असताना रमेश कवडे यांनी शेताच्या बांधावरून शिवीगाळ करून धमकी दिली.रमेश कवडे, त्यांचा मुलगा, मुलगी यांनी त्यांना धक्का मारून खाली पाडले.
त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच त्यांना बांधावर येऊ नको अशी धमकी दिली. माझ्याकडे खुप पैसे आहेत, तू मेला तरी मला फरक पडणार नाही, मी बघून घेईल, अशी धमकी दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून भाऊसाहेब जंजिरे यांनी त्यांच्या घरात असलेले कपाशीचे फवारणीचे औषध प्राशन केले. त्यांना तातडीने श्रीरामपूरच्या कामगार रुग्णालयात दाखल केले असता दि. 4 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सतीश भाऊसाहेब जंजिरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रमेश साहेबराव कवडे, विनायक रमेश कवडे, अश्वीनी रमेश कवडे यांच्याविरोधात गुहा रजि. नं. 502/2022, भादंवि कलम 306, 34, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे.