मुळा कारखान्यावरील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

मुळा कारखान्यावरील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
सोनई मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मुळा कारखाना कार्यस्थळावरील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब बानकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुळा कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष, अशोक पवार, सेक्रेटरी डी एम निमसे, कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी बद्रीनाथ काळे, स्कुल व्यवस्थापन समिती प्रमुख प्रीतम परदेशी उपस्थित होते.
कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात 10 वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेले एकूण 89 विद्यार्थी यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या या विद्यार्थ्यांची दि. 15 मार्च पासून परीक्षा सुरू होत आहे.
गेल्या सहा वर्षापासून हे विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत होते. आता 10 वीच्या परीक्षेनंतर त्यांचा शैक्षणिक प्रवास आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या शाखांमध्ये होणार आहे. विद्यालयात शिक्षण घेत असताना शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयाचा परिसर यावर जडलेले त्यांचे नाते दुरावणार असल्याने काहीशी विरहाची भावना त्यांच्या नजरेत दिसून येत होती.
यावेळी झालेल्या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम लोंढे सर यांनी प्रास्ताविक करून विद्यालयाविषयी थोडक्यात माहिती दिली व उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महिला दिनानिमित्त विद्यालयातील महिला शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे व कारखाना कामगार युनियनचे सेक्रेटरी डी एम निमसे यांनी विद्यार्थ्यांना व महिलांना शुभेच्छा देऊन एक छोटीशी कविताही यावेळी सादर केली.
यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका सौ.रोहिणी जाधव-तुवर, रमेश पंडित सर तसेच विद्यार्थिनी कुमारी साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. १० वी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक सर्वश्री आप्पासाहेब शेटे, राहुल शिंदे , अर्जुन दराडे, रमेश पंडित, सादिक शेख आदीसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंकिता नेहे हिने केले.